सांगली - २७४ कोटी २ लाखांच्या थकीत वसुलीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे आमदार, भाजपच्या माजी आमदारांच्या साखर कारखान्यांसह सूत गिरण्यांचा लिलाव काढण्यात आला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. यामध्ये केन ॲग्रो साखर कारखान्यासह स्वामी रामानंद भारती आणि खानापूर सूतगिरणी या संस्थांचा समावेश आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतलेले साखर कारखाने, सूतगिरण्या आर्थिकदृष्ट्या संकटात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील थकबाकीदार असणाऱ्या कडेगावच्या रायगाव येथील केन अग्रो सहकारी साखर कारखाना, तासगाव येथील स्वामी रामानंद भारती सूतगिरणी आणि खानापूरमधील खानापूर स्पिनिंग मिल या तीन संस्थांवर लिलावाच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. या तीनही संस्था राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपच्या आजी-माजी आमदारांशी संबंधित आहेत. तासगाव येथील स्वामी रामानंद भारती सूतगिरणी ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमनताई आर. आर. पाटील यांच्याशी संबंधित आहे. या सूतगिरणीची थकबाकी ही ५६ कोटी ४७ लाख आहे. तर खानापूर येथील खानापूर को-ऑ. स्पिनींग मिल शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्याशी संबंधित आहे. या सूत गिरणाचे २८ कोटी २१ लाख रुपये थकीत आहेत.