सांगली - कवठेमहांकाळ तालुक्यातल्या बोरगाव याठिकाणी उपसरपंच निवडीवरून झालेल्या मारामारीमध्ये एका ग्रामपंचायत सदस्याची हत्या झाली आहे. पांडुरंग काळे (वय 55) असे मयत सदस्याचे नाव आहे. तर या मारामारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामपंचायत सदस्यही गंभीर जखमी झाले आहेत. ज्यामध्ये 4 ते 5 जण जखमी झाले आहेत. जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाजपा गटाच्या कार्यकर्त्यांकडून ही हत्या झाल्याचा आरोप जखमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी केला आहे.
गट सोडल्याने सदस्याचा खून-
बोरगाव ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुमनताई पाटील व शिवसेनेचे नेते अजितराव घोरपडे यांच्या गटाचे 3 सदस्य निवडून आलेले आहेत. तर भाजपाचे खासदार संजयकाका गटाचे 8 सदस्य निवडून आलेले आहेत. आज गुरुवारी पार पडणाऱ्या उपसरपंच निवडणुकीच्या निमित्ताने बैठक आयोजित करण्यात आली होती. तर निवडणुकीमध्ये भाजप गटाच्या चार सदस्यांनी सुमनताई पाटील आणि घोरपडे गटाच्या पॅनलमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये पांडुरंग काळे यांचाही समावेश होता.
उपसरपंच निवडीवरून भाजपा कार्यकर्त्यांकडून भाजपा सदस्याची हत्या - sangali breaking news
कवठेमहांकाळ तालुक्यातल्या बोरगाव याठिकाणी उपसरपंच निवडीवरून झालेल्या मारामारीमध्ये एका ग्रामपंचायत सदस्याची हत्या झाली आहे.
या बैठकीला जात असताना भाजपच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी पांडुरंग काळेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्यांच्यावर हल्ला चढवला. ज्यामध्ये काठ्या आणि धारदार शस्त्रांनी झालेल्या मारहाणीमध्ये पांडुरंग काळे यांच्यासह राष्ट्रवादीचे 4 ते 5 जण हे जखमी झाले. यावेळी उपचारासाठी पांडुरंग काळे यांना रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
गावात तणावाचे वातावरण-
त्या घटनेनंतर जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. तर बोरगावमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी कवठेमहांकाळ पोलीसांच्यासह जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम हे सुद्धा दाखल झाले आहेत. गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलेला आहे.
हेही वाचा-फडणवीसांचे तृतीयपंथीयासोबतच्या पोस्टप्रकरणी कारवाईचे अजित पवारांचे आदेश