सांगली - मानधनवाढीसह विविध मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांनी सांगलीमध्ये सोमवारी आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य आशा वर्कर्स, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या मारत हे आंदोलन करण्यात आले. सरकारने तातडीने आमच्याा मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा वेगळा विचार करू,असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला.
अत्यंत तोकड्या मानधनात काम
राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक महिला कर्मचारी या आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर आहेत. 15 जूनपासून राज्यातल्या सर्व आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक महिला कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन करत, संप सुरू केला आहे. राज्यात सध्यास्थितीत 66 हजार आशा स्वयंसेविका आणि 4 हजार गट प्रवर्तक महिला कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत काम करत आहेत. 8 तासाच्या ड्युटीमध्ये मुख्य कामाव्यतिरिक्त अन्य 72 स्वरूपाची कामे त्यांना लागतात. मात्र त्याच्या मोबदल्यात जे मानधन मिळायला हवे, ते मिळत नाही. अत्यंत तोकड्या स्वरूपाचे मानधन मिळते, जे पाच हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. त्यांना 30 ते 35 रुपये इतका प्रतिदान भत्ता मिळतो. सध्या कोरोनाच्या परिस्थितीतही या महिला जीव धोक्यात घालून काम करत आहेत मात्र त्याचा मोबदला कोणत्याही स्वरूपात अद्याप मिळालेला नाही. असे यावेळी आंदोलकर्त्या महिलांनी सांगितले. स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यासह विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. मात्र राज्य शासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.