सांगली -कृष्णा आणि वारणाकाठी आता मगरींची धास्ती निर्माण झाली आहे. वारणा नदीकाठी असणाऱया कवठेपिराननजीक असणाऱ्या एका शेतात अजस्त्र मगर सापडली आहे. तब्बल बारा फुटी ही भली मोठी मगर आहे. ग्रामस्थ आणि वनविभागाच्यावतीने या मगरीला जेरबंद करण्यात आले आहे. त्यानंतर वनविभागाने या मगरीला ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.
पूर ओसरला, आता मगरींशी सामना -
सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्यांना आलेला महापूर ओसरला आहे. मात्र, या ठिकाणी आता एक नवं संकट नदीकाठच्या गावांमध्ये निर्माण झाला आहे, ते म्हणजे मगरींचे. गेल्या काही दिवसांपासून कृष्णाकाठी अनेक ठिकाणी मगरींचा मुक्त वावर पाहायला मिळालं होता, तर नुकताच सांगलीवाडीनजीक एक 12 फुटी महाकाय अशी मगर पकडण्यात आली होती.
अशीच एक महाकाय मगर वारणा नदीकाठी असणार्या कवठेपिरान नजीकच्या कारंदवाडी रस्त्यावरील माने वस्ती येथे पकडण्यात आली आहे. एका शेतात ही मगर आढळून आली. त्यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाला याची माहिती दिली. त्यानंतर वनविभाग आणि ग्रामस्थांनी मिळून ही भलीमोठी तब्बल 12 फुटी मगर अथक प्रयत्नांनंतर जेरबंद केली. रात्री उशिरापर्यंत मगर पकडण्याचे काम सुरू होते. त्यानंतर अजस्त्र अशा मगरीला ताब्यात घेत वनविभागाच्यावतीने नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. मात्र, मगरींचा मुक्त वावर कृष्णा आणि वारणा नदीकाठी आता होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.