सांगली - साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साठे कुटुंबियांसह दलित चळवळीने विविध मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका घेण्याचे स्पष्ट केले. सरकारने अण्णाभाऊ साठे यांना उपेक्षित ठेवण्याचे काम केले आहे, असा आरोप साठे कुटुंबीयानी केला आहे. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा, त्यांचे भव्य स्मारक उभे करावे यासह विविध मागण्या साठे कुटुंबीयांनी आज सांगलीमध्ये केल्या.
अण्णाभाऊ साठे यांची १ ऑगस्टला जयंती आहे. यंदाचे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर साठे कुटुंबीय, दलित चळवळी व विविध सामाजिक पुरोगामी संघटनांनी सांगलीमध्ये एकत्र येऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची सरकारकडून होणाऱ्या उपेक्षेबाबत नाराजी व्यक्त केली. भाजपा सरकारकडून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त शंभर कोटींची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही. आजही त्यांची जन्मभूमी असणाऱ्या सांगलीमध्ये अण्णाभाऊंचे स्मारक होऊ शकलेले नाही. त्यांची कर्मभूमी असणाऱ्या मुंबईमध्येही स्मारकाच्या अनेक घोषणा झाल्या. मात्र त्याचीही अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. हा प्रकार अण्णाभाऊ साठे यांना उपेक्षित ठेवण्याचा आहे, असा आरोप अण्णाभाऊंचे नातू सचिन साठे यांनी केला.