सांगली -राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक आणि त्यांच्या जीवनावरील चित्रपट निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनी केली. ते आज वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आयोजित जन्मशताब्दी शुभारंभ सोहळ्यात बोलत होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात बोलताना सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सरकारकडून राज्यभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सांगलीतही साठे यांच्या जन्मगावी वाटेगाव येथे आज जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे, कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह मान्यवरांच्याकडून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. तसेच जन्मशताब्दी वर्ष समारंभाच्या लोगोचे खाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात पोवाडा स्पर्धेने करण्यात आली.
यावर्षी अण्णाभाऊ साठे यांची १०० वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्ताने राज्य सरकारकडून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि मुंबईमध्ये त्यांचे स्मारक तयार करण्यात येणार आहे. ज्यामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र आणि अण्णाभाऊ साठे यांचे विचारांचे साहित्य उपलब्ध होईल, अशी माहिती खाडे यांनी दिली.
सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे, कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार शिवाजीराव नाईक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या सून सावित्रीबाई साठे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.