सांगली- खग्रास सूर्यग्रहण आज (ता. २१ ) दिसणार असून, नागरिकांनी ते सौर चष्म्यातूनच पहावे, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. यादिवशी अंनिसच्या वतीने लोकप्रबोधन केले जाणार आहे.
सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्यास सूर्यग्रहण होते, अशा परिस्थितीत तिन्हीही एका रेषेत असतात. आकाराने सूर्य चंद्रापेक्षा चारशे पट मोठा असला व सूर्य-पृथ्वी हे अंतर पृथ्वी-चंद्रांच्या अंतराच्या चारशेपट अधिक असले तरी पृथ्वीवरून चंद्र आणि सूर्य यांचा आकार समान असल्याचा भास होतो.
ग्रहणाला अशुभ, अपशकून मानण्याचे काहीच कारण नाही. ग्रहणामुळे मानवी जीवनावर कोणताही बरा वाईट परिणाम होत नाही. यामुळे गरोदर माता-भगिनींनी हे ग्रहण पाळण्याची गरज नाही. ग्रहणाबद्दलच्या पहिल्या रूढी परंपरा बाजूला ठेवा. हा फक्त सावल्यांचा खेळ असून हे विलोभनीय खगोलीय आविष्कार आहे. त्याचा आनंद लुटा, असे आवाहन जेष्ठ खगोल अभ्यासक आणि महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. नितीन शिंदे यांनी केले आहे.