सांगली - शेतकरीविरोधी असलेले केंद्राचे कायदे राज्यातल्या मंत्रिमंडळात दुरुस्त केले जातील,अशी ग्वाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तसेच भाजपाच्या दृष्टीने देशातील शेतकरी हा पाकिस्तान पेक्षा मोठा शत्रू असल्याप्रमाणे वागत असल्याची टीकाही मंत्री थोरात यांनी केली. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात सांगलीत काँग्रेसकडून आयोजित भव्य ट्रॅक्टर रॅली प्रसंगी ते बोलत होते.
बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण सहभागी..
केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात काँग्रेसकडून शुक्रवारी सांगलीत भव्य ट्रॅक्ट्रर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी ट्रॅक्टर चालवत या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. तसेच काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम, जतचे आमदार विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवक नेते विशाल पाटील, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रॅलीत संबोधन करताना काँग्रेस नेते कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम बनले सारथी..सुमारे तीनशेहून अधिक ट्रॅक्टर घेऊन काँग्रेसकडून शेतकरी जागृतीबाबत आणि कृषी विधेयकाच्या विरोधात काढण्यात आलेल्या या ट्रॅक्टर रॅलीचे नेतृत्व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत या रॅलीचा शुभारंभ केला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे दोन्ही नेते यावेळी मंत्री कदम चालवत असलेल्या ट्रॅक्टरमध्ये विराजमान झाले होते आणि मंत्री कदम यांनी सांगलीच्या एसटी स्टँड ते विश्रामबाग येथील नेमिनाथ ग्राउंडपर्यंत निघालेल्या या रॅलीत त्यांचे सारथ्य केले.
भाजपावर सर्व नेत्यांनी साधला निशाणा..या रॅलीच्या समारोप प्रसंगी काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी भाजपा सरकारच्या कृषी कायद्याला जोरदार विरोध दर्शवला. माझ्या सरकारवर यावेळी सर्वच नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले, भाजपचे हे सरकार हुकूमशाही पद्धतीने कारभार करत आहे, या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होणार आहे. मात्र काँग्रेस हे कदापि खपवून घेणार नाही, केंद्राच्या या विधेयकाच्या विरोधात काँग्रेस आता रस्त्यावर उतरलेला आहे. त्यामुळे केंद्र सरकारला शेतकऱ्यांसाठी जाचक असणारे कायदे रद्द करावेच लागतील, असे मत मंत्री कदम यांनी व्यक्त केले आहे.
ब्रिटिश राजवटी प्रमाणे केंद्राची हुकूमशाही..तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलताना, ब्रिटिश काळात ज्या पद्धतीने हुकूमशाह पद्धतीने कायदे बनवले जात होते, त्याच पद्धतीने केंद्रातील भाजपा सरकारने कोणालाही विश्वासात न घेता हे कृषी कायदे बनवलेले आहेत. हे कायदे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत जाचक आणि घातक आहेत, या कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या सुद्धा मोडण्याचा डाव या सरकारने रचला आहे. केंद्राचा हा सर्व उद्योग केवळ मूठभर उद्योगपतींच्या घशात शेती घालण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला आहे.
राज्यात विरोधी कृषी कायद्यात दुरुस्ती करणार..काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधताना, केंद्रातल्या भाजपा सरकारकडून कृषि विधेयकाच्या कायद्याला विरोध सुरु झाल्यावर आता जातीभेदाचे रंग देण्यात येत आहे. मात्र या विधेयकाला महाराष्ट्रात काँग्रेसचा कडाडून विरोध राहील आणि केंद्राची शेतकऱ्यांच्यासाठी अन्यायकारक असलेले एफआरपी असेल किंवा जे-जे राज्य आणि शेतकऱ्यांच्या विरोधात असतील ते कायदे राज्यातल्या मंत्रिमंडळ समितीच्या अभ्यासानंतर दुरुस्त केले जातील आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही मंत्री थोरात यांनी यावेळी दिली आहे.
पाकिस्तान पेक्षा शेतकरी हा भाजपाचा शत्रू..तसेच आज राज्यात साखरेचे अधिक उत्पादन होणार आहे. हंगामातील साखर शिल्लक आहे अशी सर्व परिस्थिती एफआरपी देणे अशक्य आहे, असे असताना केंद्राकडून साखर निर्यात बंद करण्यात आलेली आहे, हे कशासाठी तर शेतकऱ्यांची जिरवण्यासाठी. तसेच कांद्याच्या बाबतीत केंद्र सरकार देशात कांदा मोठ्या प्रमाणात शिल्लक असताना परदेशातून आयात करत आहे, येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चार पैैसे ज्यादा मिळु लागल्यावर कांद्याची निर्यात बंदी करून आयात सुरू केली. आता पाकिस्तानमधूनही कांदा आयात केला जाणार आहे. त्यामुळे केंद्राला पाकिस्तानपेक्षा भारतातला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो, असे सरकार दिल्लीत बसले आहे, अशी टीकाही यावेळी मंत्री थोरात यांनी केली आहे.
भेदभाव करणाऱ्या विरोधात जगात नवे चक्र सुरू..अमेरिकेतील ट्रम्प यांच्या पराभवाच्या शक्यतेवरून थोरात यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. ट्रम्पनी काळा-गोरा असा भेद केला त्यामुळे तणाव निर्माण करून मतं गोळा करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण जो जनतेत भेद निर्माण करतो त्याचा पराभव होतो, हे आता जगातील नवे चक्र सुरू झाले आहे. त्यामुळे भेदभाव करून राजकारण करता येणार नाही, असा सांगणारा निर्णय होतोय आणि हा निर्णय भारतात देखील झाल्याशिवाय राहणार नाही,असं मतही थोरात यांनी व्यक्त केले.