सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कलम १४४ लागू झाल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच रविवारपासून सोमवारी ५ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी केले आहे. तसेच, ३१ मार्चपर्यंत जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.
कायद्याचा भंग केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. जनता कर्फ्यूच्या काळात किराणा, भाजीपाला, दूध तसेच अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. मात्र, गर्दी न करता या वस्तू घ्याव्यात. तसेच कोणीही साठेबाजी करू नये. अन्यथा साठेबाजी करणाऱ्यालाही दंड करण्यात येईल, असा इशारा सुहेल शर्मा यांनी दिला आहे.