सांगली- वाढत्या महागाईच्या विरोधात सर्वपक्षीय कृती समितीने सांगलीतून तक्रार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगली जिल्ह्यातून महागाईच्या विरोधात असणारा जनतेचा रोष पत्रातून पाठवण्याचे हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
जनतेचा रोष थेट पत्रातून पंतप्रधानांकडे...
देशामध्ये महागाईच्या विरोधात सत्तेत नसताना भाजपकडून आक्रमक भूमिका घेण्यात येत होती. मात्र, गेल्या सात वर्षात देशात महागाईचा आगडोंब उठला असताना भाजपा असो किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कोणतीच दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता प्रचंड आर्थिक संकटात सापडली असून जनतेमध्ये केंद्र सरकार विरोधात प्रंचड रोष आहे, असा आरोप सांगलीतील सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने करण्यात आला असून जनतेचा हा रोष थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आता सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले आहे. सांगली महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील नागरिकांच्याकडून पत्रांद्वारे महागाई विरोधात असणारा रोष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाला पाठविण्यात येणार आहे.
या आंदोलनाची सुरुवात सोमवारी (दि. 14 जून) करण्यात आली. मारुती चौक या ठिकाणी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या तक्रार पेट्यांचे वितरण यावेळी करण्यात आले. त्यावेळी अनेक नागरिकांनी महागाईच्या विरोधात असणारा आपला रोष पत्रातून व्यक्त करत पत्रे तक्रार पेटीत टाकली. पहिल्या टप्प्यात महापालिका क्षेत्रामध्ये प्रत्येक प्रभागात तक्रार पेट्या ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अशा पद्धतीने या तक्रारी ठेवण्यात येणार आहेत आणि यातून जनतेने पत्रातून व्यक्त केलेला रोष, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याचा सर्वपक्षीय कृती समितीचे नेते सतीश साखळकर यांनी स्पष्ट केला आहे.
हेही वाचा -सांगलीत औषध विक्री व्यवसायाच्या नावाखाली 24 लाखांची फसवणूक