सांगली - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. संचारबंदीत सर्व दुकाने बंद असल्याने तळीरामांची मोठी अडचण झाली आहे. मात्र, कोणत्या ना कोणत्या मार्गाने दारू विक्री होत असल्याचा प्रकार अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. सांगलीच्या आटपाडीतील खरसुंडीमध्ये तर चक्क दुधाच्या किटलीमधून दारूच्या बाटल्या तस्करीचा प्रकार समोर आला आहे.
अजब...दुधाच्या किटलीतून दारू तस्करी; तळीरामांसाठी दारू विक्रेत्यांची शक्कल - सांगली दारू विक्री
संचारबंदीत पोलिसांचा जागोजागी बंदोबस्त आहे. असे असतानाही तळीरामांना दारू उपलब्ध होत आहे. दारू तस्करीसाठी दारू विक्रेत्यांकडून विविध शक्कला लढवल्या जात आहेत. सांगलीच्या आटपाडीतील खरसुंडीमध्ये तर चक्क दुधाच्या किटलीमधून दारूच्या बाटल्या तस्करीचा प्रकार समोर आला आहे.
संचारबंदीत पोलिसांचा जागोजागी बंदोबस्त आहे. असे असतानाही तळीरामांना दारू उपलब्ध होत आहे. दारू तस्करीसाठी दारू विक्रेत्यांकडून विविध शक्कला लढवल्या जात आहेत. सोमवारी सायंकाळी झरे रस्त्यावर नाकाबंदी सुरू असताना एक संशयित दुधाच्या किटल्या घेऊन चिंचाळेकडे जात असल्याचे काही युवकांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ खरसुंडी दूरक्षेत्राकडे कार्यरत असलेल्या पोलिसांना याची माहिती दिली.
यानंतर पोलिसांनी पाठलाग करत विठ्ठल बाळु तुपे (रा.खरसुंडी) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ३ हजार ८०० रुपये किंमतीच्या दारुच्या ११ बाटल्या, दुधाच्या किटल्या आणि दुचाकी गाडी जप्त केली. ही दारू पुरवणारा विक्रम गायकवाड (रा.चिंचाळे) याच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खरसुंडी दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय परशकर, पोलीस कर्मचाऱयांनी ही कारवाई केली.