सांगली - प्रकाश आंबेडकरांनी भडकावू वक्तव्य करू नयेत, नाही तर मराठा समाजामध्ये निर्माण झालेल्या असंतोषाचा उद्रेक होईल, असा इशारा मराठा सेवा संघाच्या वतीने देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्यावर प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या याचिकेवरून मराठा सेवा संघाचे प्रदेश संघटक अनिल पाटील-कोळेकर यांनी हा इशारा दिला. तसेच मराठा आरक्षण देण्याच्या लढ्यासाठी आता समस्त मराठा समाजाचे नेतृत्व शरद पवारांनी स्वीकारावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. ते सांगलीमध्ये बोलत होते.
मराठा आरक्षणाच्या मागण्यांबाबत अखिल भारतीय मराठा सेवा संघाने राज्य सरकारला 9 ऑक्टोबरपर्यंत 'अल्टिमेटम' दिला आहे. आरक्षणाच्या बाबतीत योग्य निर्णय न झाल्यास 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद 100 टक्के होणार, असा इशारा अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्यावतीने महाराष्ट्र प्रदेश संघटक अशोक पाटील-कोकळेकर यांनी सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत दिला. यावेळी पाटील यांनी काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांच्यावरही टीका केली. काँग्रेसकडून मराठा आरक्षण मिळण्याची कसलीही अपेक्षा राहिली नाही. मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे निष्क्रिय ठरले असून अशोक चव्हाण यांच्याकडून आरक्षण समितीचे कामकाज काढून घ्यावे आणि मराठा आरक्षण समितीचे कामकाज राष्ट्रवादीच्या सक्षम मंत्र्यांकडे द्यावे, अशी मागणी करत शरद पवार हेच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ शकतात, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.