सांगली-जिल्ह्यातील महापुरात अडकलेल्या पूरग्रस्तांना हेलिकॉप्टरमधून फुड पॅकेट्स वाटप करण्यात आले. यावेळी हेलिकॉप्टरमधून जलमय झालेला कृष्णाकाठ आणि खाली फेकण्यात येणारे फूड पॅकेट गोळा करणाऱ्या पूरग्रस्तांची झुंबड, हे दृश्य या महापुराची दाहकता दाखवणारी आहेत.
जलमय झालेला कृष्णा काठ व अन्न गोळा करणाऱ्या पूरग्रस्तांचे विदारक हवाई दृश्य - कृष्णा नदीला महापूर
सांगलीत कृष्णा नदीला महापूर आलेला आहे. चार दिवसांपासून जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नदीला आलेल्या पुराचा शेकडो गावांमध्ये वेढा बसला आहे. भुकेने व्याकूळ झालेले पूरग्रस्त अन्न घेण्यासाठी तुटून पडत असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले.
सांगलीत कृष्णा नदीला महापूर आलेला आहे. चार दिवसांपासून जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नदीला आलेल्या पुराचा शेकडो गावांमध्ये वेढा बसला आहे. सांगली शहराला याचा खूप मोठा फटका बसला आहे. निमगाव आणि सांगली पाण्याखाली आहे. मागील चार दिवसांपासून अनेक गावांमध्ये हजारो नागरिक अडकून पडलेले आहेत. नागरिकांना रेस्क्यू करून आता आर्मी आणि एनडीआरएफचे पथक बाहेर काढत आहेत. मात्र, बोटींच्या अपुरी संख्येमुळे पुरात अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचणे अशक्य बनले आहे.
राज्य सरकारने अखेर या ठिकाणी नेव्हीचे हेलिकॉप्टर पाठवून दिले होते. शुक्रवारी सकाळपासून सांगली शहरासह, मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील पुरात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारे फुड पॅकेट्स पोहोचवण्यात आले. हवेतून खाली छतावर असलेल्या नागरिकांकडेही फूड पॅकेट टाकण्यात आले. भुकेने व्याकूळ झालेले पूरग्रस्त अन्न घेण्यासाठी तुटून पडत असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले. त्याचबरोबर अवकाशातून कृष्णाकाठची घेण्यात आलेली दृश्य व फुड पॅकेट्स गोळा करणाऱ्या पूरग्रस्तांची उडालेली झुंबड पाहिल्यानंतर या महापुराची दाहकता लक्षात येईल.