सांगली -राजू शेट्टींच्या विजयाचाही आणि पराभवाचा गुलालही आम्हीच लावला आहे. त्यांनी आता पंचगंगेच्या डोहात आंघोळ करून स्वच्छ होण्यासाठी काशीला जावे, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. आपणासही घात आल्यावर पेरणी करण्यास येते आणि ते आपण दाखवून दिले, असल्याचेही ते म्हणाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या विरोधात वाळवा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ते सांगलीमध्ये बोलत होते.
शेट्टींच्या जय-परायजयाचा गुलाल आम्हीचं उधळला - सदाभाऊ खोत संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. या पराभवानंतर शेट्टी यांचे एकेकाळीचे कट्टर समर्थक व सध्या कट्टर विरोधक असलेले कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली. राजू शेट्टी हे या निवडणुकीत प्रस्थापितांच्या बाजूला गेले, ज्यांच्या विरोधात १५ वर्षे लढलो त्यांच्याच मांडीवर जाऊन शेट्टी बसले. मात्र, जनतेला हे अजिबात आवडले नाही, शेट्टींचा मार्ग चुकल्याने जनतेने त्यांना नाकारले. शेट्टी यांनी आता पुन्हा आत्मक्लेश यात्रा काढून जनतेची माफी मागितली पाहिजे, आणि पंचगंगेच्या डोहात आंघोळ करून स्वच्छ होण्यासाठी काशीला जायला हवे, असा टोलाही त्यांनी यावेळी शेट्टींना लगावला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला. शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या हे सगळं पाहून नरेंद्र मोदी यांना आम्ही पाठिंबा दिला. त्यावेळी राजू शेट्टी निवडून आले. सत्तेत आल्यावर सरकार प्रश्न सोडवत होते. पण मी मंत्री झाल्यावर सरकारच्या विरोधात राजू शेट्टी यांनी विरोध सुरू केला. खरं तर स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. मात्र, हुजऱ्याचे ऐकून लढणारी माणसे मातीत घालण्याचे काम राजू शेट्टी यांनी केले, असा घणाघाती आरोप खोत यांनी केला.
शेट्टींच्या पराभवाबद्दल बोलताना आम्हाला चळवळीचा पराभव करायचा नव्हता, व्यक्तीचा पराभव करायचा होता. कारण शेट्टींचा मार्ग चुकला होता, अशी खंतही यावेळी मंत्री खोत यांनी व्यक्त केली. शेट्टींकडून केल्या जाणाऱ्या घात आल्यावर पेरणी करण्याच्या इशाराचा समाचार घेताना ते म्हणाले, ते ज्या मातीत तयार झाले, त्याच मातीत मी तयार झालो. त्यामुळे दोन वर्षांपासून आपण जमीन तयार करत होतो. भरपूर पाऊस झाल्यावर पेरणी कशी करायची हे आपल्याला चांगले माहिती आहे, असे सांगत त्यांनी राजू शेट्टींच्या विजयाचा गुलाल सुद्धा आपण लावला होता आणि पराभवाचा गुलाल सुद्धा आम्हीच लावला आहे, असा टोला खोत यांनी लगावला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत वाळवा मतदारसंघातून जयंतराव पाटील यांच्या विरोधात मतदारसंघातील विरोधकांना एकत्र करून एकमताने उमेदवार देण्याबाबत विचार करणार आहे. तसेच आपणाही या मतदारसंघात इच्छुक असल्याचेही यावेळी मंत्री खोत यांनी स्पष्ट केले.