महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महापूर इफेक्ट : कृष्णा व वारणा काठचा शेती पॅटर्न बदलला..शेतकरी शाश्वत पिकाच्या शोधात!

महापूर आणि त्या पाठोपाठ आलेल्या कोरोनामुळे कृष्णा आणि वारणा काठाचा शेतकरी पुरता उध्वस्त झाला आहे. परिणामी यंदा जिल्ह्यात "पीक पॅटर्न" पद्धतीत बदल पाहायला मिळतोय. बहुतांश शेतकऱ्यांनी अन्य नगदी पिके सोडून ऊसाला अधिक पसंती दिली आहे. सोयाबीन क्षेत्रावर याचा मोठा परिणाम झाला आहे.

By

Published : Jul 14, 2020, 7:23 PM IST

satara irrigation news
कृष्णा व वारणा काठचा पीक पॅटर्न बदलला..शेतकरी शाश्वत पिकाच्या शोधात!

सांगली - महापूर आणि त्या पाठोपाठ आलेल्या कोरोनामुळे कृष्णा आणि वारणा काठाचा शेतकरी पुरता उध्वस्त झाला आहे. परिणामी यंदा जिल्ह्यात "पीक पॅटर्न" पद्धतीत बदल पाहायला मिळतोय. बहुतांश शेतकऱ्यांनी नगदी पिके सोडून ऊसाला अधिक पसंती दिली आहे. सोयाबीन क्षेत्रावर याचा मोठा परिणाम झाला आहे. तब्बल ८ हजार एकर क्षेत्रावरील सोयाबीन तसेच भाजीपाला
आणि फुलशेतीचे पीक यंदा घटले आहे. तर ऊस शेती शाश्वत असली, तरीही शेतकऱ्यांवर दराच्या अनिश्चिततेचे संकट कायम असणार आहे.

कृष्णा व वारणा काठचा पीक पॅटर्न बदलला..शेतकरी शाश्वत पिकाच्या शोधात!
जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णाकाठ सधन आणि समृद्ध शेतीचा भाग मानला जातो. वारणा आणि कृष्णेच्या पाण्याने शेती समृद्ध केली; तशी याच नद्यांच्या पुराने ही शेती बुडवली सुद्धा! अशाया पाणीदार नदी काठावर प्रामुख्याने भाजीपाला, सोयाबीन आणि ऊसाचे पीक घेण्यात येते. सर्वाधिक क्षेत्र या ठिकाणी सोयाबीनचे आहे. त्याखालोखाल भाजीपाला पिकतो.
बहुतांश शेतकऱ्यांनी अन्य नगदी पिके सोडून ऊसाला अधिक पसंती दिली आहे

वारणा आणि कृष्णाकाठची वांगी देखील प्रसिद्ध आहेत. सोयाबीन, भाजीपाला, फूल शेती अशा नगदी पिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आर्थिक स्थैर्य मिळवले. या भागातून मुंबई, पुणे व राज्याबाहेर भाजीपाला आणि फुले मोठ्या प्रमाणात पाठवली जातात. मात्र गतवर्षी ऑगस्ट महिन्यातील महापुराने ही शेती उध्वस्त केली. हजारो हेकटर शेती पाण्याखाली गेली. एक एक महिने शेतात पाणी साचून राहिल्याने शेतकरी अडचणीत सापडला.

वारणा आणि कृष्णेच्या पाण्याने शेती समृद्ध केली; तशी याच नद्यांच्या पुराने ही शेती बुडवली सुद्धा!
मात्र महापूराच्या संकटातूनही इथला शेतकरी खचला नाही. पुन्हा तो उभारला व शेती जोमाने करू लागला. पण ऐन भरात पिक आले असताना पुन्हा एक फटका बसला. तो म्हणजे 'कोरोनाचा'.आणि या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शेती पुन्हा संकटात सापडली. काबाडकष्ट आणि कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी पिकावलेला माल वावरातच सडला. तर कुठे कवडीमोल दराने भाजीपाला विकावा लागला. काही शेतकऱ्यांनी तोडणी खर्चही परवडत नसल्याने संपूर्ण शेतावर नांगर फिरवावा लागला.
महापूर आणि त्या पाठोपाठ आलेल्या कोरोनामुळे कृष्णा आणि वारणा काठाचा शेतकरी पुरता उध्वस्त झाला आहे.
सोयाबीन ऐवजी ऊसाला प्राधान्य

२०१९ मध्ये वारणा आणि कृष्णाकाठवर ४२ हजार ७०० हेकटर सोयाबीन क्षेत्र होते. मात्र यंदा ते ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर आले आहे. ८ हजार हेक्टर क्षेत्र कमी झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला कृष्णा व वारणा काठसह ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. २०१९ मध्ये जिल्ह्यातील ऊसाचे क्षेत्र १ लाख ४ हजार ४२२ हेक्टर होते. यंदा २०२० मध्ये ते वाढून १ लाख ११ हजार ९४५ हेक्टर झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांनी दिली. ऊसा मध्ये अंतरपीक म्हणून शेतकरी सोयाबीनची अधिक पेरणी करत होते. मात्र गतवर्षीच्या महापुरामुळे तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी टाळल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णाकाठ सधन आणि समृद्ध शेतीचा भाग मानला जातो.
महापुरानंतर शेतकरी शाश्वत शेतीकडे

शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते संजय कोले यांच्या मते गतवर्षी महापुराच्या आधी शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी घेतली होती. भाजीपाला, सोयाबीन सिमला मिर्ची अशी नगदी पिके बहरली होती. मात्र ऑगस्ट महिन्यातील महापुराने या शेतीवर पाणी फिरवले. त्यामुळे शेतकरी शाश्वत शेतीकडे वाळू लागला होता. ऊस हा एकमेव पर्याय आहे. पण दराचा प्रश्न आणि बिलं वेळेत मिळत नसल्याने येथील शेतकऱ्यांना रब्बीत पुन्हा भाजीपाला,समिला मिर्ची आणि फूल शेतीवर भर द्यावा लागला. पीक हात तोंडाशी आलं असताना कोरोनाचे संकट शेतकऱ्यांवर आले. यानंतर बाजार समित्या बंद झाल्या. माल शेतात सडला. यानंतर यंदा शेतकऱ्यांनी शाश्वत पीक असणाऱ्या ऊसाकडे मोर्चा वळवला आहे.

पूर आणि अन्य संकटांना देखील ऊस शेती तोंड देऊ शकते. त्यामुळे दोन पैसे हातात येऊ शकतात़. यंदा कोरोनामुळे साखरेचा उठाव झाला नाही. ऊसाच्या वाढलेल्या क्षेत्रामुळे शेतकऱ्यांवर दराचे संकट असणारच आहे. मात्र किमान एफआरपीचे पैसे येतील, ही अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा काठच्या अनेक शेतकऱ्यांनी यंदा ऊस शेतीचा रस्ता धरल्याचे संजय कोले यांनी सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष व शेतकरी संजय बेले यांच्या मते यंदा वारणा आणि कृष्णा काठी दोन प्रकारचा शेतकरी वर्ग आहे. यामध्ये अल्प भूधारक आणि अधिकची जमीन असणारा शेतकरी असे प्रकार मोडतात. प्रामुख्याने अल्पभूधारक शेतकरी हा नेहमीच ताजे पैसे म्हणून भाजीपाला, फुलशेती करतात. गतवर्षी खरीप हंगामात लावलेला भाजीपाला आणि फूलशेती पुरात बुडाली. यातून पुन्हा सावरताना पारंपरिक शेती केली. मात्र पुन्हा लॉकडाऊनमुळे त्याची माती झाली. त्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी दोन वेळा झालेल्या नुकसानामुळे काहीच पेरले नाही. तर इतर शेतकऱ्यांनी ऊसाकडे मोर्चा वळवला आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात ऊसाची पेरणी होते. मात्र यावेळी जून -जुलै महिन्याताच शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केलीय.ऊसाच अधिक लागवड आणि वाढलेल्या क्षेत्रामुळे दराचा प्रश्न निर्माण होणार, हे नक्की आहे. पण नुकसानीत जाऊन खर्च सुद्धा हातात येणार नाही. त्यापेक्षा ऊसाची शेती बरी,अशी भावना शेतकऱ्यांध्ये असल्याचे संजय बेले यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदी काठच्या शेतकऱ्यांवर एकामागून एक संकट आले. यातून सावरण्यासाठी पीक पद्धतीत बदल करण्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांसमोर पर्याय नव्हता. त्यामुळे नेहमीची पीक घेण्याऐवजी ऊसाची शेतीला अधिक पसंती दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details