सांगली - मिरज शहरातल्या ड्रेनेज दुरवस्थेच्या विरोधात खोकीधारक आणि रिक्षाचालकांनी स्थानिक आमदार व प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले आहे. रास्तारोको करत थेट ड्रेनेजच्या पाण्यात झोपून यावेळी निषेध नोंदवण्यात आला.
ड्रेनेज दुरावस्थेच्या विरोधात खोकीधारकाचे चक्क पाण्यात लोटांगण घेत आंदोलन केले अतिवृष्टीनंतर मिरज शहरातल्या ड्रेनेज व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. शहरातले अनेक रस्ते पाण्याच्या विळख्यात सापडलेली आहेत. मिरज जंक्शनचा रस्ता हा गटारगंगेत रूपांतर झाला आहे. अनेक भागात पाणी तुंबल्याने मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येत आहे, त्यामुळे शहरातल्या अर्ध्याहून अधिक भागाला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा पडला आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांना तसेच वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे वारंवार लक्ष वेधण्याचा प्रयत्न ही स्थानिक पातळ्यांवर करण्यात येत आहे. मात्र, स्थानिक आमदार, महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि पालिका प्रशासन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या रिक्षाचालक आणि खोकीधारक संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन केले. एसटी स्टँड चौकापासून मिरज जंक्शन दरम्यान रास्तारोको आंदोलन करत ड्रेनेज व्यवस्था सुरळीत करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. या रास्तारोको आंदोलनामुळे यामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तर या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी यावेळी एका संतप्त खोकेधारकाने थेट ड्रेनेजच्या पाण्यामध्ये झोपून प्रशासन आणि आमदार सुरेश खाडे यांचा निषेध नोंदवला.जंक्शनच्या रस्त्याची गटारगंगा !मिरज जंक्शनकडे जाणारा रस्ता हा जवळपास ड्रेनेजच्या पाण्यामुळे पूर्ण व्यापला आहे. त्याचबरोबर इथल्या रस्त्याचे ही मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आल्याने रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता पूर्ण बंद झाला आहे. परिणामी हा सर्व परिसर ड्रेनेजच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे रेल्वे जंक्शनकडे जाणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर, या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फी असणाऱ्या सुमारे 80 हुन अधिक खोकेधारकांचा व्यवसाय हा गेल्या पंधरा दिवसांपासून बंद पडला आहे.
अन्यथा ड्रेनेजचे पाणी पालिकेच्या दारात ओतणार!
दरम्यान महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी या ठिकाणी येऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तातडीने कारवाई करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. अखेर याबाबत सोमवारी बैठक घेण्याचे आश्वासन पालिका उपायुक्त पाटील यांनी दिले आहे. बैठक घेऊन ठोस भूमिका जाहीर करत तातडीने ड्रेनेजच्या पाण्याची विल्हेवाट लावली पाहिजे, अन्यथा ड्रेनेजचे पाणी महापालिकेच्या दारात नेऊन ओतण्यात येईल, असा इशारा यावेळी रिक्षाचालक आणि खोकीधारक संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.