सांगली -पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद जोशी प्रणित संघटनेने धरणे आंदोलन केले. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी असलेले नुकसान भरपाईचे शासन निकष बदलावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. ऊस, सोयाबीन, हळद, भुईमूग अशा अनेक पिकांचे महापुरात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक हेक्टर पर्यंत जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी केली आहे.
या निर्णयावर शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने आक्षेप नोंदवला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या दोन, तीन, चार, पाच हेक्टरपर्यंत जमिनी आहेत. त्यामुळे एक हेक्टरपर्यंतच पीक कर्ज माफी करणे शेतकऱ्यांवर अन्याय आहे, असा आरोप शेतकरी संघटनेने सरकारवर केला आहे.