सांगली - महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस अधिकारांच्या बदलीचे आदेश गृहमंत्रालयाने नुकतेच दिले आहेत. यामध्ये सांगलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांची पुणे, खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुख पदी नियुक्ती झाली आहे. सांगली पोलीस दलाकडून त्यांना निरोप देण्यात आला. जिल्ह्यातील कार्यकाळातील आठवणींना उजाळा देत सांगलीकरांचे प्रेम विसरू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया बोराटे यांनी दिली. दोन वर्षांपूर्वी बोराटे हे सांगलीत अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले होते. शांत आणि संयमी स्वभाव असणाऱ्या बोराटे यांनी दोन वर्षात जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांचा छडा लावण्यात मोलाची कामगिरी बजावली.
सांगलीकरांचे प्रेम विसरू शकणार नाही - अतिरिक्त पोलीस अधीक्षक बोराटे
सांगलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांची पुणे, खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुख पदी नियुक्ती झाली आहे. यावेळी कार्यकाळातील आठवणींना उजाळा देत, सांगलीकरांचे प्रेम विसरू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया बोराटे यांनी दिली.
भीमा-कोरेगाव दंगलीचे सांगलीत उमटलेले पडसाद आपल्या कर्तबगारीने नियंत्रणात आणत शांतता प्रस्थापित करण्याचे काम केले. तसेच शेतकरी संघटनांची ऊस आंदोलने, मराठा क्रांती मोर्चा अश्या अनेक घटना त्यांनी यशस्वीपणे हाताळल्या. त्यामुळे सांगली जिल्ह्यात बोराटे यांची कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली. दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने अखेर बोराटे यांची गृह विभागाकडून बदली करण्यात आली आहे.
बदलीनंतर सांगली पोलीस दल व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून बोराटे यांना जड अंतकरणाने निरोप देण्यात आला. दोन वर्षांमध्ये सांगली जिल्ह्यात काम करताना अनेक स्तरातून प्रेम मिळालं त्यामुळे आपण यशस्वी कामगिरी करू शकलो. सांगली जिल्ह्यातली दोन वर्षांची कारकीर्द आजवरच्या सेवेतील स्मरणात राहणारी आहे, असं ते म्हणाले. बोराटेंच्या जागी खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुख मनीषा डुबल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.