सांगली- मुंबईतील एका वकील महिलेची जर्मनीत डॉक्टर असल्याचा भासवून 14 लाखांची फसवणूक करणाऱ्या एका ठगाला विटा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री आणि मैत्रीचं प्रेमात रूपांतर झाल्यानंतर विट्याच्या लेंगरेमधील वैभव शिंदे या तरुणाने हा गंडा घातल्याचे समोर आले आहे.
माहिती देताना पोलीस निरीक्षक सोशल मीडियावरचा जर्मनीतील डॉक्टर
सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीचे अनेक प्रकार घडत आपल्याला पहायला मिळतात. तर या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोण कुणाला कसा गंडा घालेल, याचा आता नेम राहिला नाही. सांगलीच्या विटा नजीकच्या लेंगरे गावातील एका तरुणाने थेट मुंबईच्या वकील महिलेला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. वैभव शिंदे, असे या ठगाचे नाव आहे. गेल्यावर्षी कोरोनाच्या टाळेबंदीमुळे सर्वच काही बंद पडले. संपर्काचे साधन होते, फक्त सोशल मीडिया आणि सोशल मीडियाचा कल्पक वापर करून वैभव शिंदे यांनी फेसबूक, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावर बनावट खाते सुरू केले. जर्मनीत डॉक्टर असल्याची प्रोफाईल आणि एक देखणा फोटो लावत अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट धाडल्या.
भावनिक करून महिलेला घातला गंडा
यापैकी एक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारलेली मुंबईतील महिला वकील वैभवच्या जाळ्यात सापडली. आपण जर्मनीत डॉक्टर असल्याचे भासवून वैभवने वकील महिलेशी फेसबूक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री वाढवली. त्यातून एकमेकांचे मोबाईलनंबर आदान-प्रदान झाला. हा संपर्क वाढल्यानंतर वैभवने महिला वकिलाचा विश्वास संपादन करत आपले एटीएम कार्ड बंद पडले आहे. आपल्याला आर्थिक अडचण आहे, असे सांगून कधी आईला कोरोना झाला आहे. कधी वडील वारले आहेत, कधी बहिणीच्या पतीची प्रकृती गंभीर आहे, अशी कारणे सांगून वर्षभरात तब्बल 14 लाख 92 हजार रुपये आपल्या मित्रांच्या खात्यात मागवून घेतली. सदर रक्कम ही जर्मनीतून परत आल्यानंतर परत करत असे सांगत पैसे घेतले.
सोशल मीडिया खाते बंद व ठग जेरबंद
सात जूननंतर वैभव शिंदे यांनी आपला फेसबूक आणि इंस्टाग्रामवरचे खाते डिलीट केले. त्यानंतर मुंबईच्या वकील महिलेला संशय आला आणि तिने शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून 12 जूनला विटा पोलीस ठाण्यामध्ये याबाबतची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार तपास करत वैभव शिंदे याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली आहे.
हेही वाचा -सांगली जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश; निर्बंधात शिथिलता