सांगली- बदलत्या परिस्थितीत काँग्रेसला आता पक्षांतर्गत आव्हान राहिले नसून बाहेरचे आव्हान आहे, याला मजबूत आणि सक्षम काँग्रेस पक्ष आव्हान देईल, असा विश्वास महाराष्ट्र काँग्रेसचे नूतन कार्याध्यक्ष आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे. तसेच जनतेच्या बदलत्या काळातील गरजा याचे भान ठेवून काम करेल, असा विश्वासही कदम यांनी व्यक्त केला आहे. सांगलीच्या पलूस येथे ते बोलत होते.
आता पक्षांतर्गत नव्हे बाहेरचे आव्हान, सक्षम काँग्रेस बदलत्या गरजांचे भान ठेवून काम करेल - विश्वजित कदम - बाळासाहेब थोरात
काँग्रेस पक्षाकडून राज्यातील काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. यामध्ये काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्षपदी कडेगाव -पलूसचे आमदार विश्वजीत कदम यांची निवड करण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाकडून राज्यातील काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. यामध्ये काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्षपदी कडेगाव -पलूसचे आमदार विश्वजीत कदम यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर विश्वजीत कदम यांनी काँग्रेस पक्षाचे आभार मानत, काँग्रेस नेतृत्वाने देशातल्या आणि राज्यातल्या बदलत्या राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन नव्या आणि जुन्या नेतृत्वांची सांगड घालून एक मोठी जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्यापासून माझ्यापर्यंत सोपवली आहे, असे मत कदम यांनी व्यक्त केले आहे. तसेच स्वर्गीय माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या काँग्रेसला काँग्रेसच संपवू शकते या विधानावर बोलताना, कदम साहेबांची ही म्हण आता जुनी झाली आहे. त्या काळातली त्या परिस्थितीवर ती म्हण होती, मात्र आता परिस्थिती बदलली आहे आणि या बदलत्या परिस्थितीमुळे काँग्रेस पक्षामध्ये आतून कोणतेही आव्हान नसून बाहेरचे आव्हान काँग्रेस पक्षाला आहे. एक मजबूत व सक्षमपणे काँग्रेस याला आव्हान देईल, असा आशावाद कदम यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर काळ बदलतोय आणि जनतेच्याही गरजा या बदल्यात काळात बदलत आहेत. त्यामुळे मतदार, जनतेच्या गरजांचे भान ठेवून काँग्रेस काम करेल असा विश्वास विश्वजित कदम यांनी व्यक्त केला आहे.
तसेच मध्यंतरी आपण भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवा, चर्चा सुरू होत्या. त्यावेळी आपण कुठेही जाणार नसल्याचे सांगितले होते. आता तर पक्षाने आपल्यावर एक मोठी जवाबदारी दिली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि स्वर्गीय पतंगराव कदम यांचे विचार सोडून आपण कोठेही जाणार नसल्याचे विश्वजित कदम यांनी स्पष्ट केले आहे.