सांगली -महाविकास आघाडी सरकारकडून पूरग्रस्तांची फसवणूक करण्यात आली आहे, असा आरोप शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच, पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत सरकारकडून आता व्यापार सुरू असल्याची टीकाही शेट्टी यांनी केली आहे. पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी इस्लामपूरमध्ये काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चा प्रसंगी ते बोलत होते.
पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा -
सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्यांच्या आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या गावांचा प्रचंड नुकसान झाले आहे. हजारो लोकांचे संसार बुडाले, शेती उद्ध्वस्त झाली. अशा परिस्थितीमध्ये आता एक महिना उलटून गेला आहे. मात्र, अद्याप राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत पूरग्रस्तांना मिळाली नाही. त्याचबरोबर पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप, भाजपा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे. यामुळे सरकारच्या विरोधात इस्लामपूरमध्ये मंगळवारी भाजपा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी, इस्लामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर प्रांत कार्यालयावर हा आक्रोश मोर्चा निघाला, ज्यामध्ये हजारो पूरग्रस्त सहभागी झाले होते.
पुनर्वसन नव्हे, हा तर व्यापार -
आक्रोश मोर्चाच्या प्रसंगी बोलताना, राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. पूरग्रस्तांच्या पुनर्वसन बाबतीत आता अजित पवार यांनी भूखंड देण्याबाबत केलेले वक्तव्य म्हणजे, सरकारकडून व्यापारी सुरू असल्याची टीका शेट्टी यांनी केली. तसेच, आपण 2005, 2006, 2019 चा महापूर आणि त्यानंतर सरकारची मदत देखील पाहिली आहे. मात्र, आज एक महिना उलटून देखील पूरग्रस्तांना तातडीचे सानुग्रह अनुदान द्यायचे असतात, ते देखील मिळालेले नाही. यावरून या महाविकास आघाडी सरकारचे मानसिकता आणि ममता स्पष्ट होते, असा आरोप त्यांनी केला आहे.