साप मारून फोटो व्हायरल करणे तरुणाला पडले महागात
सापाला मारून त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी एका तरुणास सांगलीच्या कडेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
सांगली - सापाला मारून त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणे एक तरुणाला महागात पडले आहे. याप्रकरणी सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. वन विभागाकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील मौजे शिवणी या गावातील तरुण मारुती खराडे याच्या मळ्यातील शेड जवळ धामण जातीचा एक साप आला होता. त्यानंतर मारुतीने भितीपोटी काठीने त्या सापाला ठार मारले. मात्र, यानंतर मारुतीने या मृत सापा सोबतच फोटो काढून ते फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल केले. हा व्हायरल झालेला फोटो कडेगाव वनक्षेत्रपालांपर्यंत पोहोचला आणि त्यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यानंतर वन्यजीव कायद्याअंतर्गत कडेगाव पोलीस ठाण्यात मारुती खराडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार कडेगाव पोलिसांनी मारुती खराडे या तरुणाला अटक केली आहे. त्यामुळे त्या तरुणाला साप मारून त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणे हे चांगलेच महागत पडले आहे.