सांगली- सध्या जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे, गरजूंचे हाल होत आहे. अशातच काही सामाजिक कार्यकर्ते, संस्था, नागरिक स्वेच्छेने पुढे येऊन गरजूंची मदत करत आहेत. वाळवा तालुक्यातील रेठरे हरणाक्ष या गावातील एक नागरिकही गरजूंच्या मदतीला धावून आला आहे. बाळासाहेब कांबळे असे या नागरिकाचे नाव असून ते ज्येष्ठांना आपल्या चारचाकी वाहनातून मोफत प्रवास सुविधा देत आहे.
कौतुकास्पद..! रेठरे हरणाक्ष येथील एक व्यक्ती ज्येष्ठांना देतोय मोफत वाहन सेवा - free vehicle service to seniors sangli
आर्थिक अडचणीत असलेले, रुग्णालयात जण्याची व्यवस्था नसलेल्या ज्येष्ठांना कांबळे घर ते रुग्णालय, असे मोफत ने-आण करतात.
आर्थिक अडचणीत असलेले, रुग्णालयात जण्याची व्यवस्था नसलेल्या ज्येष्ठांना कांबळे घर ते रुग्णालय, असे मोफत ने-आण करतात. त्यांच्या अल्टो या वाहनामध्ये सॅनिटायझर, फळ व इतर साहित्यांचीही सोय आहे. एकदा बाळासाहेब कांबळे हे आपल्या आईला घेऊन रुग्णालयात जात होते. मात्र, स्वतःची गाडी असतानाही लॉकडाऊनमुळे ते दवाखान्यापर्यंत पोहचू शकले नाही. यावर आपल्याकडे वाहन असताना अडचणी येतात, तर इतर ज्येष्ठांचे काय हाल होत असतील हा मुद्दा कांबळे यांच्या आईने मांडला. आईचे हे शब्द ऐकून बाळासाहेब कांबळे यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या अल्टो गाडीतून तालुक्यातील जेष्ठ नागरिकांना मदत करण्याचे कार्य सुरू केले. कांबळे हे सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने त्यांना शक्य होईल तोपर्यंत हे महान कार्य करणार आहेत. पण, एखाद्या दानशूर व्यक्तीने गाडीच्या इंधनाची सोय केली तर हे काम पुढे सुरू ठेवण्याची तयारी बाळासाहेब कांबळे यांनी दर्शवली आहे. दरम्यान, कांबळे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा-सांगलीत बेदाण्यांची ऑनलाईन विक्री सुरु; पहिल्याच व्यवहारात 940 क्विंटल बेदाण्यांची विक्री