सांगली - तुंग येथे एका ७ वर्षीय मुलीचा खून झाल्याची घटना घडली होती. या खुनाचा अखेर उलगडा झाला आहे. एका अल्पवयीन मुलाने पॉर्न व्हिडिओ दाखवत लैंगिक अत्याचार करून हा खून केल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या प्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
मिरज तालुक्यातील तुंग जवळील एका वसाहतीमधील एक सात वर्षाची मुलगी बुधवारी रात्रीपासून बेपत्ता होती. सायंकाळी दुकानातून खाऊ आणण्यासाठी ती घराबाहेर पडली होती. मात्र, उशिरापर्यंत ती घरी न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. गुरुवारी सकाळी गावातील एका ऊसाच्या शेतात बेपत्ता झालेल्या या चिमुरडीचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली होती. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.