सांगली -पाच-पन्नास हजाराचा नव्हे, तर चक्क दीड कोटीचा बोकड सांगलीच्या आटपाडीतील बाजारात विक्रीला आला होता. किंमती प्रमाणे त्याचे नावही आश्चर्च चकित करणारे आहे. या बोकड्याचे नाव मोदी असे आहे. या बोकड्याला 70 लाखांना मागणी करण्यात आली आहे.
दीड कोटीचा मोदी बकरा...
पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या आटपाडीच्या बाजारात कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने आज बाजार भरला. या बाजारात सांगोला तालुक्यातील चांडोलवाडी येथील मेंढपाळ बाबुराव मेटकरी यांचा बोकड विक्रीला आला होता. मेटकरी यांनी बोकड्याला दीड कोटीची बोली लावली होती. मात्र, त्याला 70 लाखापर्यंत मागणी झाली. मात्र, मेटकरी यांनी दीड कोटीशिवाय बोकड विक्री करणार नसल्याचा निर्णय घेतल्याने त्याची विक्री होऊ शकली नाही.
मोदीच्या पिल्लूलाही लाखांचा भाव..
तर याच बाजारात आटपाडीतील सोमनाथ जाधव यांच्या मेंढीला 13 लाख रुपये इतकी मागणी झाली. ही मेंढी प्रसिद्ध मोदी बोकडाचे पिल्लू आहे. त्यांनी ती दोन लाखाला खरेदी केली होती. सोमनाथ जाधव यांच्या अन्य तीन मेंढ्यांना तब्बल नऊ लाख रुपयांना मागणी आली. तर, मासाळवाडी येथील शिवाजी तळे यांच्या सात महिन्याच्या मेंढीला चार लाख रुपयांची मागणी आली.
जनावरांसाठी आटपाडीचा प्रसिद्ध बाजार..
आटपाडीचा बाजार प्रसिद्ध असून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून लाखो जनावर या बाजारात विक्रीला आणली जातात. बाजारात कोटींची उलाढाल होत असते, त्यामुळे या जनावरांना चांगला दर मिळतो. त्यामुळे, शेतकरी मेंढपाळ आवर्जुन या बाजारात खरेदी-विक्रीसाठी येतात.
हेही वाचा -धनगर आरक्षणप्रश्नी महाआघाडी सरकार अपयशी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत नोंदवला निषेध..