सांगली -जिल्ह्यातील दोन आमदार, जिल्हा पोलीस प्रमुख आणि माजी आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये तासगावच्या आमदार सुमनताई आर. आर. पाटील, विटयाचे आमदार अनिल बाबर, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा आणि आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचा समावेश आहे. सर्वांची प्रकृती उत्तम असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या आणि मृत्यूसंख्येत वाढ होत आहे. शनिवारी ६१२ नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर ३६ जण मृत्युमुखी पडले आहेत. तर ३१६ जन हे कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल ६ हजार ९२७ इतकी झाली असून आतापर्यंतचा आकडा हा १६ हजार २६२ झाला आहे. यापैकी ८ हजार ७०२ कोरोनामुक्त तर आज अखेर ६३३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
सर्वसामान्य नागरिकांसोबतच आता लोकप्रतिनिधी आणि पोलिस अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. तासगावच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन दिवसापूर्वी त्यांचे चिरंजीव रोहित आर. आर. पाटील आणि आर. आर. आबा यांचे बंधू सुरेश पाटील या दोघांना कोरोना झाल्याचे समोर आले होते. त्यावेळी आमदार सुमनताई पाटील यांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला होता. पण शनिवारी पुन्हा तपासणी करण्यात आली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिघांची प्रकृती उत्तम असून सर्व जण पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.
आटपाडी-विट्याचे शिवसेना आमदार अनिल बाबर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी आमदार बाबर यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान बाबर यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच खानापूर आटपाडी जतचे माजी आमदार भाजप नेते राजेंद्र अण्णा देशमुख यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. देशमुख यांचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती उत्तम असून घरीच आयसोलेट होऊन उपचार घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा सुद्धा कोरोनाबाधित आढळले आहेत. दोन दिवसांपासून शर्मा यांना त्रास जाणवत होता, त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. शर्मा यांची प्रकृती स्थिर असून शर्मा ते होम क्वारंटाइन झाले आहेत.