सांगली- जिल्ह्यातील शिवसेना आणि शिवसैनिकांची मुस्कटदाबी आणि दुजाभावाची वागणूक राष्ट्रवादीचे जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील असल्याची तक्रार सांगली शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
आघाडीचे मंत्री जयंत पाटील शिवसेनेचे खच्चीकरण करताहेत, शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - sangli NCP news
सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांकडून शिवसैनिकांची मुस्कटदावी व दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याची तक्रार जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी याबाबतचे गाऱ्हाणे पक्षप्रमुख असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडले आहे. तसेच जयंत पाटील हे सत्तेचा गैरवापर व जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांचे खच्चीकरण करत असल्याचा आरोपही संजय विभूते यांनी केला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.
सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी, असा संघर्ष सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही एकत्र आहे. सांगली जिल्हास्तरावर मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दरी वाढत असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून शिवसेना आणि शिवसैनिकांच्यावर अन्याय तसेच दुजाभावाची वागणूक देण्यात येत असल्याची तक्रार सांगली जिल्हा शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. राज्यात एकत्र सरकार असताना सांगली जिल्ह्यात मात्र जयंत पाटील हे शिवसेनेवर वारंवार अन्याय करणारी भूमिका घेत आहेत, असा आरोप विभुते यांनी केला आहे.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येऊन आज एक वर्षाचा काळ लोटत आलेला आहे. मात्र, असे असताना जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटलांनी कोणत्याही प्रकारची समन्वयाची बैठक अद्याप शिवसेनेसोबत घेतली नाही. जिल्ह्यातील शिवसैनिकांच्यावर पोलिसांच्या माध्यमातून खोटे गुन्हे दाखल करणे, शासनाच्या समितीवर स्थान देण्यात दुजाभाव करणे, जिल्ह्यातील एकमेव शिवसेनेचे आमदार असणाऱ्या अनिल बाबर यांचे अनेक पातळ्यांवर खच्चीकरण मंत्री जयंत पाटील करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
राज्यात असणाऱ्या महाविकासआघाडीतील मुख्य पक्ष असणाऱ्या शिवसेनेची सांगली जिल्ह्यामध्ये फरफट सुरू असून संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी ही शिवसैनिकांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे जी पदे आहेत त्यांचा राजीनामा देणार असल्याचा, इशाराही यावेळी संजय विभूते यांनी दिला आहे. जयंत पाटलांनी स्वतःचा पक्ष जरुर वाढवावा. पण, शिवसेनेची कुचंबना करू नये, असे मतही यावेळी विभूते यांनी व्यक्त केले आहे.
एकूणच सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पालकमंत्री जयंत पाटील यांच्या बाबतीत असणारी खदखद मुख्यमंत्र्यांचे समोर मांडण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये संघर्षाची चिन्ह निर्माण होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा -'राज्य तर शरद पवार चालवतात मग उद्धव ठाकरेंना भेटून काय उपयोग'