सांगली - ट्रॅक्टरसोबत एक तीन वर्षीय मुलगा विहिरीत पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना कवठेमहांकाळच्या बनेवाडी याठिकाणी घडली आहे.
ट्रॅक्टरमधून पडल्याने एकाचा वाचला जीव
कवठेमहांकाळ तालुक्यातील बनेवाडी येथे ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने तेजस श्रीरंग माळी या तीन वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी (दि. 23 जाने.) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. तर या घटनेत तेजसचा मोठा भाऊ गुरुनाथ श्रीरंग माळी हा ट्रॅक्टरमधून खाली पडल्याने बचावला आहे.
क्लजवर दाबला गेल्याने घडली घटना
बळेवाडीच्या माळी वस्तीत श्रीरंग माळी यांची शेती आहे. शेतामध्ये श्रीरंग माळी शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची दोन चिमुकली मुले तेजस आणि गुरुनाथ हे दोघेही आली होते. दिवसभरात शेतीची काम उरकल्यानंतर श्रीरंग माळी आपल्या दोन्ही मुलांना घेऊन ट्रॅक्टरमधून घरी निघाले होते. ट्रॅक्टरमध्ये श्रीरंग माळी यांनी आपल्या दोन्ही मुलांना बसवले. मात्र, काही साहित्य राहिला आहे, असे त्यांच्या लक्षात आल्याने ते ट्रॅक्टरमधून उतरले व साहित्य आणण्यासाठी गेले. त्याच दरम्यान ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या दोन्ही मुलांपैकी एकाने ट्रॅक्टरचा क्लज दाबला. आधीच ट्रॅक्टर हा घसरणीला (उताराला) उभा होता. क्लज दाबताच ट्रॅक्टर ही वेगाने शेजारी असणार्या विहीरीकडे जाऊ लागला. त्यावेळी ट्रॅक्टरमध्ये असणारा चार वर्षाचा गुरुनाथ माळी ट्रॅक्टरमधून खाली पडला. मात्र, तेजस हा ट्रॅक्टर सोबतच विहिरीमध्ये जाऊन पडला.
शर्थीचे प्रयत्नानंतर तेजस व ट्रॅक्टर बाहेर
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कवठेमहांकाळ पोलीसही या ठिकाणी पोहचले. रात्री उशिरापर्यंत विहिरीमधून तेजस आणि ट्रॅक्टरला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांच्याकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. विद्यूत मोटारीने विहिरीतून मोठ्या प्रमाणात पाणी काढण्यात आले. तब्बल तीन तासानंतर ट्रॅक्टर व तेजसला बाहेर काढण्यात आले. मात्र, तेजसचा जीव गेला होता. या घटनेने बनेवाडी गावावर शोककळ पसरली आहे.