सांगली -सांगलीमध्ये वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार समोर आला आहे. एका पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या ग्राहकाला तब्बल 95 हजार रुपयांचे बिल वीज वितरण कंपनीकडून पाठवण्यात आले आहे. त्यामुळे मोलमजुरी करणाऱ्या ग्राहकाला विजेच्या या बिलामुळे मोठा धक्का बसला आहे.
कोरोना काळात वीज वितरण कंपनीकडून वीजबिलांमध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. याविरोधात ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र सांगलीमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला चक्क 95 हजारांचे बिल पाठवण्यात आले आहे. रघुनाथ वाळखंडे असे या व्यक्तीचे नाव आहे. रघुनाथ यांनी शहरातील रामनगर परिसरात पत्र्याची खोली भाड्याने घेतली असून, ते तिथेच राहतात. ते 400 रुपये मजुरीवर वीट भट्टीवर कामावर जातात. मात्र या एका खोलीचे वीजबिल 95 हजार रुपये आल्याने आता हे भरायचे कसे असा प्रश्न या गरीब मजुराला पडला आहे.