इस्लामपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी रक्तदान शिबिर घेण्याचे जाहीर केले होते. माणुसकीचे नाते या ग्रुपच्या व्यवस्थापनात 1 मे ला महाराष्ट्र दिनानिमित्त हे रक्तदान शिबीर पार पडले. या शिबिरात इस्लामपूर व परिसरातील एकूण 662 युवक व नागरिकांनी रक्तदान केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेला रक्ताचा तुटवडा यामुळे होणारे रुग्णांचे हाल , याउद्देशाने ' माणुसकीचं नातं ' या ग्रुपच्या माध्यमातून पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे, उद्योगपती सर्जेराव यादव, पो.नि. नारायण देशमुख यांनी या ग्रुपवरील सदस्यांच्या माध्यमातून रक्तदान करण्यासाठी आवाहन केले होते.
देशात आणि त्याचबरोबर राज्यातील कोरोनाची परिस्थिती भयंकर आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रक्तदान शिबीरे न झाल्याने रक्तपेढ्या रिकाम्या पडल्या आहेत. रक्ताचा तुडवडा असून, रक्त मिळत नसल्याने रुग्ण तडफडत आहेत, काहींना जीवही गमवावे लागत आहेत. ही गरज ओळखून पिंगळे यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले.