सांगली -कोरोनाच्या धास्तीमुळे भयभीत होऊन तामिळनाडू आणि केरळकडे निघालेले 500 हून अधिक कामगार सध्या मिरजेत अडकले आहेत. या कामगारांचे प्रशासनाने प्रबोधन करून त्यांच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या कामगारांनी आता याच ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतलाय.
तामिळनाडू आणि केरळकडे पायी निघालेल्या 500 कामगारांचे सांगलीत प्रबोधन मुंबई, पुण्यापाठोपाठ जिल्हयात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने सध्या सर्वत्र भितीचे वातावरण आहे. एकाच कुटुंबातील तब्बल पंचवीस जणांना रोगाची लागण झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली.
परराज्यातील शेकडो कामगार सांगली आणि मिरज एमआयडीसीत काम करतात. रुग्णांच्या वाढत्या संख्येने आता हे कामगार जिल्ह्यातून बाहेर पडण्याच्या वाटा शोधू लागले आहेत. मिरजेतून तब्बल 500 हून अधिक कामगार केरळ आणि तामिळनाडूकडे निघाले होते. याची माहिती पोलीस आणि प्रशासनाला मिळताच तहसीलदार रणजित देसाई आणि पोलीस उपअधीक्षक संदीपसिंग गिल यांनी आपल्या पथकासह त्यांना जवळील शाळेच्या मैदानावर एकत्र केले.
यानंतर सोशल डिस्टन्स ठेऊन त्यांना बसवण्यात आले; आणि या सर्वांचे प्रबोधन केले. तसेच वाहतुकीची सेवा पूर्ववत होईपर्यंत त्यांची याच ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली आहे. याचप्रमाणे त्यांना अन्नाचा पुरवठा देखील करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.