सांगली- सांगलीच्या इस्लामपूर मधील आणखी 5 जणांना कोरोना लागण झाली आहे. ज्या चार जणांना या आधी कोरोनाची लागण झाली होती. त्याच कुटुंबातील हे 5 जण आहेत. या सर्वांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले आहे. सांगलीतील कोरोना बाधितांची संख्या आता 9 वर पोहोचली आहे.
सांगलीत कोरोनाचे आणखी 5 रुग्ण.. हेही वाचा-''गावाकडच्या लोकांनी कायदा हातात घेऊ नये, पोलिसांना त्यांचे काम करू द्या''
सौदी अरेबिया येथून उमराह यात्राकरुन परतलेल्या इस्लामपूर येथील चार जणांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर प्रशासनाने त्यांच्या घरातील जवळच्या दहा नातेवाईकांना मिरजेच्या आयसोलेशन कक्षात दाखल केले होते. या सर्वांची लाळेचे नमुने (स्वॅब टेस्ट) तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यामध्ये पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून उघड झाले. यामध्ये 2 महिला, 2 पुरुष आणि एका मुलीचा समावेश आहे.
त्या चार जणांच्या संपर्कात अजून किती जण आले आहेत. याची तपासणी करण्यात येत आहे. प्रशासनाकडून त्यांना शोधून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता 562 वर पोहोचली. महाराष्ट्रात मंगळवारी आणखी एका रुग्णाच्या मृत्युमुळे देशातील करोनाबळींची संख्या 10 वर गेली. देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण टाळेबंदी जाहीर केली आहे. मात्र, टाळेबंदी झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत असल्याने आवश्यकता भासल्यास संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. अखेर केंद्राने 21 दिवसांची देशव्यापी टाळेबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडता घरातच बसावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.