सांगली : जत शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अमृतवाडी फाटा येथे तीन वाहनांचा अपघात झाला आहे. देवदर्शन करून गावी परत येत असताना ही दुर्घटना झाली आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यातील चार जण हे एकाच कुटुंबातील होते. भरधाव जाणारी स्विफ्ट कार डंपरवर आदळून तीन वाहनांचा अपघात झाला. एकाच कुटुंबातील चौघा जणांच्या मृत्यूच्या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
देवदर्शन करुन येताना झाला अपघात :गाणगापूरहून जतकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट कारचा अमृतवाडी फाटा येथे अपघात झाला. या कारमध्ये सावंत कुटुंब होते. हे कुटुंब जत शहरात राहत होते. सासू-सासरे,सून आणि नातवंड असे सावंत कुटुंब भाड्याच्या स्विफ्ट कारने एक दिवसांपूर्वी गाणगापूर या ठिकाणी देवदर्शनासाठी गेले होते. गाणगापूर येथून देवदर्शन घेतल्यानंतर हे कुटुंब पुन्हा जतकडे परतण्यासाठी विजापूर मार्गे येत होते. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास सावंत कुटुंबीयांची चार-चाकी स्विफ्ट गाडी ही विजापूर-गुहागर मार्गावरील अमृतवाडी फाटा या ठिकाणी पोहोचली.
तीन वाहनांचा अपघात :यावेळी कार वेगात होती कारची समोरुन येणाऱ्या ट्रकशी टक्कर होणार होती. चालकाने ही धडक वाचविण्यासाठी कार दुसरीकडे वळवली परंतु कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या डंपरवर आदळली. डंपरला आदळल्यानंतर कार रस्त्याच्या बाजुच्या शेतात पलटी झाली. डंपरला कारची जोरात धडक लागल्याने उभा असलेला डंपरदेखील पलटी झाला. समोरुन कार वेगाने आल्याने ट्रक चालकाचाही वाहनावरील ताबा सुटला आणि तो ट्रकदेखील पलटी झाला. दरम्यान या अपघातात सावंत कुटुंबातील चारजणांचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे. त्याच्यावर जतच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.