सांगली - सांगली महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून जीर्ण इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे. जवळपास साडेतीनशेच्या आसपास इमारती जीर्ण अवस्थेमध्ये उभ्या आहेत. या धोकादायक इमारती स्वतःहून पाडण्याबाबत अनेकदा मालमत्ता धारकांना पालिकेकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच ज्या इमारती अतिधोकादायक बनलेल्या हेत्या अशा 65 इमारती पालिका प्रशासनाकडून जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.
जीर्ण इमारतींचा प्रश्न गंभीर
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात 5 लाखांहून अधिक लोकसंख्या आहे. या तिन्ही शहरात मोठ्या संख्येने इमारती आहेत. यामध्ये जीर्ण झालेल्या इमारतींचीही संख्या अधिक आहे. पावसाळ्यात या इमारती पडण्याचा धोका अधिक असतो. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून महापालिका प्रशासनाकडून जीर्ण इमारतीबाबत कडक पाऊले उचलण्यात येत आहेत. दोन वर्षांपूर्वी पालिकेकडून जीर्ण इमारतींच्याबाबतीत संबंधित मालमत्ताधारकांना नोटीस देखील बजावण्यात आली होती. काही धोकादायक इमारती महापालिका प्रशासनाकडून पाडण्यात आल्या. मात्र 2019 मध्ये आलेल्या महापुरानंतर धोकादायक इमारतीचा प्रश्न रेंगाळल्याचे पाहायला मिळत आहे.
जीर्ण इमारती व घरांचा सर्व्हे
सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिका क्षेत्रातील जीर्ण इमारतींचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेच्या बांधकाम विभागाकडून तिन्ही शहरतील जीर्ण झालेल्या इमारतींचा सर्व्हे करण्यात आला. ज्यामध्ये सुमारे 350 हून अधिक इमारती जीर्ण असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये एक मजलीपासून पाच माजलीपर्यंतच्या इमारतींचा समावेश होता. तर 65 इमारती या धोकादायक असल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर पालिकेकडून सर्व जीर्ण इमारत व घर मालकांना नोटिसा बजावत स्वतःहून जीर्ण इमारती पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.