सांगली- खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण ३४४ मतदान केंद्रावर उद्या(सोमवारी) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदरासंघात एकूण ३४ मतदान केंद्रावर वेबकास्टींग करण्यात येणार आहे. या ३४ मतदान केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.
गार्डी व पडळकरवाडी या गावातील दोन मतदान केंद्र अतिसंवेदनशील मतदान केंद्रे आहेत. त्या ठिकाणी सुक्ष्म निरीक्षक (मायक्रो ऑबझर्व्हर) नेमण्यात आले आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज असून ३४ मतदान केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत, अशी माहिती खानापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शंकर बर्गे यांनी दिली आहे.
खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये १ लाख ६६ हजार ६७६ पुरूष मतदार, १ लाख ५५ हजार ६५९ स्त्री मतदार आहेत. तर ८ तृतीयपंथीय मिळून असे एकूण ३ लाख २२ हजार ३४३ इतके मतदार आहेत. मतदान केंद्रावरील कर्मचार्यांना जुने शासकीय धान्य गोदाम येथून मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. मतदान केंद्रावरील साहित्य घेऊन केंद्रावरील कर्मचारी रवाना झाले आहेत. मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी ५५ एसटी बसची व ११ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे.
३४४ मतदान केंद्रावर राखीवसह एकूण २ हजार १०७ कर्मचार्यांची नियुक्ती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने एकूण १२ पोलीस शेलटर तयार करण्यात आले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी १, पोलीस निरीक्षक ३, पोलीस उपनिरीक्षक १३, पोलीस कर्मचारी २८६, होमगार्ड १९३, आरसीपी पथक, व सीआयएसएफची १ कंपनी असा चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
विटा येथील मतदान केंद्र क्र. ६३ महात्मा गांधी विद्यालय या ठिकाणी महिला मतदान केंद्र (पिंक पोलिंग स्टेशन) उभारण्यात येणार आहे. या मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्षासह सर्व महिला कर्मचारी कामकाज करणार आहेत. तसेच विटा येथील तलाठी कार्यालयातील मतदान केंद्र क्र. ७३ मध्ये आदर्श मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे.