सांगली - महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता स्थापनेवरून सुरू असलेल्या नाट्यमयघडामोडी पाहता, आमदार फुटीचे मोठे संकट राष्ट्रवादी समोर आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार आहेत. यामध्ये विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांचा समावेश आहे आणि जिल्ह्यातील तीनही आमदार शरद पवार यांच्या मागे ठाम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेत भाजपसोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीच्या मोठा गट अजित पवारांच्या पाठीशी असल्याचे बोलले जात आहे, या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या मागे कोणते आमदार असतील याबाबतीत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान 3 आमदार आहेत, यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान विधिमंडळ गटनेते जयंतराव पाटील, आमदार सुमनताई पाटील आणि आमदार मानसिंगराव नाईक यांचा समावेश आहे.
आमदार जयवंत पाटील -
इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील हे सलग 7 वेळा निवडून आले आहेत. जयंत पाटील हे शरद पवार यांचे निष्ठावान मानले जातात. राष्ट्रवादीच्या सत्तेत पाटील यांच्यावर अनेक महत्त्वाच्या खात्यांची जवाबदारी शरद पवार यांनी सोपवली होती. तसेच गेल्या 5 वर्षांपासून फुटीचे ग्रहण लागलेल्या पक्षाची होत असलेली घसरण पाहता, शरद पवारांनी जयंतराव पाटील यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवली होती.आणि जयंत पाटील यांनी अडचणीच्या काळात पक्षाला नवी दिशा देण्याचे काम केले. तर सध्याची राजकीय परिस्थितीत अजित पवारांनी पक्षाची सोडलेली साथ पाहता, शरद पवारांनी अजित पवार यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेते पदाची धुरा अत्यंत विश्वासूपणे सोपवली आहे.