सांगली -बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा सांगली पोलिसांनी पर्दाफाश केला. दोन हजार रुपयाच्या बनावट नोटा बनवून खपवणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. यावेळी ९० हजार किंमतीच्या 2 हजार व 200 रुपयाच्या बनावट नोटांसह 1 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.
बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
पोलिसांनी 2 हजारच्या 45 आणि, 200 रुपयाच्या 4 नोट जप्त केल्या आहेत. तसेच नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे 20 हजाराचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी विजय कोळी, शरद हेगडे आणि तेजस गोरे याला अटक करण्यात आली आहे.
बनावट नोटा खपवताना रंगेहाथ पकडले
कुपवाड शहरतील दत्तनगर या ठिकाणी रेकॉर्डवरील गुन्हेगार विजय कोळी व त्याचा मित्र बनावट नोटा खपवण्यासाठी थांबले आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलीस पथकाने छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे 2 हजाराच्या 39 व 200 रुपयाची 1 अशी हुबेहूब बनावट नोट आढळली. याबाबत चौकशी केली असता, या बनावट नोटा असल्याची कबुली दोघांनी दिली. तर, विजय कोळी याने सांगितले की, शरद हेगडे याने आपल्याला या बनावट नोटा खपवण्यासाठी दिल्या आहेत आणि आम्ही दोघे त्या खपवत होतो. त्यानंतर पोलिसांनी हेगडे याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील मोरोची येथील नातेवाईक तेजस गोरे याच्या घरात बनावट नोटा छापण्यात येत असल्याची माहिती दिली.
हेही वाचा -भंडारा दुर्घटनेची सरकारकडून गंभीर दखल - पालकमंत्री विश्वजीत कदम