सांगलीच्या ग्रामीण भागात होणार 20 हजार रॅपिड अँटीजेन टेस्ट - जिल्हाधिकारी - सांगली रॅपिड अँटीजेन टेस्ट न्यूज
दिवसेंदिवस सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात युध्दपातळीवर रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू केल्या आहेत. लवकरच ग्रामीण भागातही २० हजार रॅपिड अँटीजेन टेस्ट होणार असल्याची, माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली.
सांगली - दिवसेंदिवस सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात युध्दपातळीवर रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू केल्या आहेत. लवकरच ग्रामीण भागातही २० हजार रॅपिड अँटीजेन टेस्ट होणार असल्याची, माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली. तसेच नागरिकांनी गैरसमज करून न घेता, ही टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन करत सदरची टेस्ट विश्वाहार्य व गुणवत्तापूर्ण असून, यामध्ये कोरोना निगेटीव्ह असणाऱ्या रूग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह येत नसल्याचे जिल्हाधिकारी चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
सांगली जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झालेली आहे. सांगली महापालिकेच्यावतीने पालिका क्षेत्रात अँटीजेन टेस्ट सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये जवळपास पंधराशेहून अधिक टेस्ट घेण्यात आल्या असून, आतापर्यंत यामध्ये दीडशेहून अधिक जण पॉझिटिव्ह आलेले आहेत. मात्र, या टेस्टवरून नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे. लक्षणे नसतानाही टेस्ट पॉझिटिव्ह येत असल्याने याबाबतचा संभ्रम निर्माण होऊन, अनेक नागरिकांनी या टेस्टवर आक्षेप नोंदवत टेस्ट करण्यासाठी नकार देण्याच्या घटना घडत आहेत. याबाबत सांगलीच्या जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी खुलासा केला आहे. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू असून, जास्तीत जास्त लोकांची चाचणी करणे व कोरोनाबाधित असणाऱ्या रूग्णांवर त्वरीत उपचार करून प्रादुर्भावाला अटकाव करणे या टेस्टचा हेतू आहे. स्वत:ची सुरक्षा व प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही टेस्ट महत्वाची आहे. तसेेच या टेस्ट विश्वाहार्य व गुणवत्तापूर्ण असून नागरिकांना याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा व टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
लवकरच अँटीजेन टेस्ट ग्रामीण भागात सुरू करण्यात येत असून, जिल्ह्यात किमान 20 हजार रॅपिड अँटीजेन करण्यात येणार आहेत. यामध्ये 50 वर्षावरील व्यक्ती, कोमॉर्बीडीटी आहेत अशा व्यक्ती, दाटीवाटीच्या लोकवस्तीमधील तसेच कंटनेमेंट झोनमध्ये प्राधान्याने या टेस्ट करण्यात येणार आहेत. तसेच ज्या ठिकाणी रॅपिड अँटीजेन टेस्ट आरोग्य यंत्राणामार्फत सुरू आहेत,त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करू नये. रॅपिड अँटीजेन टेस्टबद्दल पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे सांगत अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिला आहे.