सांगली - रविवारी कोरोनामुळे सांगली महापालिका क्षेत्रातील दोन महिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा हा 19 वर पोहचला आहे. तर दिवसभरात 9 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तसेच 13 जण कोरोना मुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोना उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांचा रविवारी मृत्यू झाला. मिरजेतील दोन महिला कोरोनाच्या बळी ठरल्या आहेत. मिरज शहरातील माने प्लॉट येथील 80 वर्षीय वृद्ध महिलेचा तसेच सुंदर नगर येथील 78 वर्षाची वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. दोघींवर मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू होते.