सांगली -वाळवा तालुक्यातील पेठ व तांदुळवाडी येथे सोमवारी रात्री पोलिसांच्या पथकाने छापा टाकून सुमारे १४ लाख रुपये किमतीचा १७० किलो गांजा व मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी सुदाम काकासो बाबर ( वय ५० रा.पेठ. ता. वाळवा ) व संतोष संभाजी तोडकर (वय ४२ रा. तांदुळवाडी ता. वाळवा ) दोघाना अटक केली आहे. या दोघांना न्यायालयाने २३ ऑक्टोबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली.
वाळवा तालुक्यातील पेठ, तांदुळवाडी येथे पोलिसांचा छापा; १७० किलो गांजा हस्तगत - पेठ गांजा जप्त बातमी
वाळवा तालुक्यातील पेठ व तांदुळवाडी येथे सोमवारी रात्री पोलिसांच्या पथकाने छापा टाकून सुमारे १४ लाख रुपये किमतीचा १७० किलो गांजा व मुद्देमाल हस्तगत केला.
मानवी मनोविकारावर परिणाम करणारा गांजा मोठ्या प्रमाणावर सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस नाईक उत्तम तुकाराम माळी यांनी तक्रार दिली आहे. पेठ व तांदुळवाडी येथे छुप्या पद्धतीने गांजाची विक्री होत असल्याची माहिती इस्लामपूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता दोघांकडे तब्बल १७० किलो वजनाचा गांजा मिळाला. सुदाम बाबर याच्या पेठ येथील राहत्या घरी पोलिसांनी सोमवारी रात्री पावणे अकरा वाजता छापा टाकला. तेथे बेकायदेशीररित्या ४ किलो ५० ग्रॅम गांजा मिळून आला. त्याची किंमत ३२ हजार इतकी आहे. तर संतोष संभाजी तोडकर याच्या तांदुळवाडी येथील घरी रात्री साडे बारा वाजता छापा टाकला. यावेळी संतोष याच्या अमोल तोडकर या भावाच्या घरी १६६ किलो ११ ग्रॅम गांजा मिळून आला. याची किंमत १३ लाख २८ हजार ८८० इतकी आहे.
दोन्ही ठिकाणी एकत्रित १० पोती मिळून आली. दोघांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक इसाक चौगुले, पोलीस हवालदार दिपक ठोंबरे,पोलीस नाईक ,शरद जाधव, उत्तम माळी, अरुण पाटील, प्रशांत देसाई, मीनाक्षी माळी, सचिन सुतार, उमेश राजगे यांच्या पथकाने कारवाई केली. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ अधिक तपास करीत आहेत.