सांगली - वसंतदादा शासकीय रुग्णालयामध्ये एका अकरा वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत मुलीच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. भाजपा महिला आघाडीकडून संबंधित डॉक्टरांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाला नसल्याचे स्पष्ट करत आरोपांचे खंडन करण्यात आले आहे.
उपचारा दरम्यान मुलीचा मृत्यू
सांगलीच्या वसंतदादा शासकीय रुग्णालयामध्ये एक एप्रिलला सातारा जिल्ह्यातल्या पळसवाडी येथील 11 वर्षीय प्रतीक्षा सदाशिव चव्हाण ही घश्याच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल झाली होती. तीन एप्रिलला प्रतीक्षावर शस्त्रक्रिया पार पडली. मात्र, शस्त्रक्रिया झाल्यानंतर सोमवारी 5 एप्रिलला उपचारा दरम्यान प्रतीक्षाचा मृत्यु झाला.
हलगर्जीपणेमुळे मुलीचा मृत्यू
यानंतर मृत प्रतीक्षाच्या आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला. कोणत्याही प्रकारची मृत्यूची स्थिती नसताना केवळ घश्याच्या शस्त्रक्रियेमुळे मृत्यू कसा होऊ शकतो ? असा प्रश्न उपस्थित करत डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मृत प्रतीक्षाचे वडील सदाशिव चव्हाण आणि आई आशा चव्हाण यांनी केला आहे. संबंधित डॉक्टरांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत मृतदेह घेण्यास त्यांनी नकार दिला आहे.
'किरकोळ ऑपरेशनमध्ये मृत्यू कसा'
सदाशिव चव्हाण म्हणाले, मुलीला आपण घशाच्या शस्त्रक्रियेसाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात 1 एप्रिलला दाखल केली होते. या आधी शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया होईल,असे सांगितले होते. त्यामुळे आपण आपल्या मुलीला एक एप्रिलला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. तीन एप्रिलला तिच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर आपल्या मुलीला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्यानंतर पाहिले असता तिच्या घशातून रक्तस्त्राव सुरु असल्याची बाब निदर्शनास आली, आपण डॉक्टरांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली, त्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन पुन्हा शस्त्रक्रिया केली. मात्र, त्यांनतर ती बेशुद्ध अवस्थेत बाहेर आली. त्यांनतर तिची अवस्था अत्यंत नाजूक होती. 3 दिवस मुलगी आयसीयू मध्ये होती. डॉक्टरांच्याकडून मुलगी बरी आहे, असे सांगण्यात येत होते. मात्र, सोमवारी सकाळी डॉक्टरांकडून तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. किरकोळ ऑपरेशनमध्ये मृत्यू होत असेल तर मोठ्या ऑपरेशनचे काय? असा सवाल करत माझ्या मुलीला आणि कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, त्याशिवाय आपण मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सदाशिव चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.
चौकशी करून कारवाई करावी -
या घटनेची माहिती मिळताच भाजपा महिला आघाडी मोर्चा उपाध्यक्ष कोमल चव्हाण यांनी महिला कार्यकर्त्यांसह शासकीय रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी चव्हाण कुटुंबाची भेट घेऊन धीर देत या प्रतीक्षा चव्हाण मृत्यू प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
हलगर्जी नाही, पण तक्रार असेल तर चौकशी करू -
याबाबत रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर नणंदकर यांच्याशी संपर्क साधला असता, नातेवाईकांनी केलेल्या आरोपांचे खंडन करत, डॉक्टरांच्याकडून कोणत्याही प्रकारची हलगर्जी झालेला नाही. अंतर्गत रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला आहे. मात्र, नातेवाईकांचे काही आरोप असतील तर त्याची शहानिशा केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पालकमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश -
सांगली जिल्ह्या दौऱ्यावर असणाऱ्या पालकमंत्री जयंत पाटील यांना, या प्रकरणाची माहिती प्रसार माध्यमांनी दिली. याची मंत्री जयंत पाटील यांनी तातडीने दखल घेत, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना सर्व प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या.