सांगली -दिल्लीतील निजामुद्दीनच्या मरकझशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संबंध आलेले ११ जण समोर आले आहेत. या सर्वांना शोधून प्रशासनाने तातडीने इन्स्टिट्यूट क्वारंटाईनमध्ये दाखल केले आहे. मात्र त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे अद्याप आढळून आलेली नाहीत, तरीही यातील चौघांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
डॉ.संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक, शासकीय रुग्णालय दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या मरकझमधून सांगली जिल्ह्यातील ३ जण असल्याची माहिती समोर आली आहे. आधीच इस्लामपूर येथे 25 कोरोना रुग्ण आढळल्याने चक्रावलेले प्रशासन यामुळे हबकून गेले आहे. जिल्हा प्रशासनाने दिल्लीच्या मरकझ येथून परतलेल्या त्या तिघांचा तातडीने शोध सुरू केला. यातून एकूण ११ जणांचा मरकझशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आढळून आला आहे.
दिल्लीच्या मरकझमध्ये असणाऱ्या एका व्यक्तीच्या वडिलांना प्रशासनाने त्याच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून खबरदारी म्हणून ताब्यात घेतले आहे. त्यांची रवानगी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये केली आहे. तर, मरकझमधील एका कोरोनाबाधित रुग्णाने दिल्ली ते मुंबई विमान प्रवास केल्याची बाब समोर आली. याच विमानातून सांगलीच्या तिघांनी प्रवास केल्याचे जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आल्याने आज आरोग्य विभागाने त्या तिघांना संपर्कात आल्याच्या संशयावरून खबरदारी म्हणून इन्स्टिट्यूट क्वारंटाईन मध्ये दाखल केले आहे.
तसेच, इस्लामपूर, तासगाव, सांगली आणि मिरज येथून ४ जण हे मरकझमध्ये गेल्याचे समोर आले आहे. आणखी ३ जणही गेल्या फेब्रुवारी महिन्यात जाऊन आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यासर्वांना खबरदारी म्हणून सांगलीमध्ये इन्स्टिट्यूट क्वारंटाईनमध्ये दाखल करण्यात आले आहे. या ११ जणांमध्ये अद्याप कोरोनाची लागण झाल्याची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र, खबरदारी म्हणून ४ जणांचे स्वॅब टेस्टसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे यांच्याकडून देण्यात आले आहे.