सांगली - सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना रोगाचा प्रादुर्भाव हळूहळू ओसरू लागला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे अनेक कोरोना रुग्णालय रिकामे पडत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील 11 खासगी कोरोना रुग्णालयांचे कोरोना सेंटर बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
जुलैपासून ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढले होते -
गेल्या काही महिन्यांपासून सांगली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला होता. जुलैपासून ऑगस्टपर्यंत जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण संख्येने अनेक रेकॉर्ड केले होते. त्यामुळे जिल्ह्यामध्ये अनेक कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होण्यापासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. परिणामी मृत्यूचा आकडाही वाढत होता. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन, जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अनेक खासगी रुग्णालय ताब्यात घेऊन, त्या ठिकाणी कोरोना रुग्णालय सुरू केले होते. मात्र, ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीनंतर जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये घट होऊ लागली आणि हळूहळू कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव हा कमी होऊ लागला आहे.
शहरातील अनेक कोरोना रुग्णालयात एकही कोरोना रुग्ण नाही -
हेही वाचा -...म्हणून नाशिकच्या सर्व बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बंद
त्यामुळे सध्या सांगली जिल्ह्यातल्या अनेक कोरोना रुग्णालयांमध्ये शून्य कोरोना रुग्णसंख्या झाली आहे. घटत्या कोरोना रुग्णांची संख्या, त्यामुळे कोरोना रुग्णालय रिकामी पडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाला कोरोना रुग्णालय बंद करून पूर्ववत रुग्णसेवा सुरू करण्याची परवानगी मागण्यात आली होती. त्यानुसार सांगली महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील 11 खासगी कोविड रुग्णालयांना कोरोना सेंटर बंद करून नॉन कोविड रुग्णालय म्हणून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
ही कोरोना सेंटर आणि रुग्णालये केली बंद -
ज्यामध्ये डॉ. शरद घाडगे यांचे घाडगे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सांगली, डॉ. महेश दुदनकर यांचे दुदनकर हॉस्पिटल सांगली, डॉ. अनिल मडके यांचे श्वास हॉस्पिटल सांगली, डॉ.महेश जाधव यांचे अपेक्स हॉस्पिटल मिरज, डॉ. रविंद वाळवेकर यांचे भगवान महावीर कोविड हॉस्पिटल सांगली, डॉ.दिपक शिखरे यांचे लाईफकेअर हॉस्पिटल सांगली, डॉ. चोपडे यांचे दक्षिण भारज जैन समाज हॉस्पिटल सांगली, डॉ. सचिन सांगरूळकर यांचे साई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल इस्लामपूर, डॉ. शालिवाहन पट्टणशेट्टी यांचे मयुरेश्वर हॉस्पिटल जत, कवठेमहांकाळ येथील कोविड हेल्थ सेंटर व विटा येथील कोविड केअर सेंटर रुग्णालयांचा समावेश आहे.