रत्नागिरी- रत्नागिरीच्या महिला व बाल विकास विभागामार्फत शुक्रवारी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' कार्यक्रमांतर्गत महिला सक्षमीकरण व महिला बळकटीकरणाचे संदेश देण्यासाठी भाट्येसमुद्रकिनाऱ्यावर भव्य मानवी साखळी तयार करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी यांनी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या फलकाचे अनावरण केले.
महिला दिन : भाट्ये समुद्रकिनारी भव्य मानवी साखळी, महिला सक्षमीकरणाचा दिला संदेश
रत्नागिरीच्या महिला व बाल विकास विभागामार्फत शुक्रवारी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' कार्यक्रमांतर्गत महिला सक्षमीकरण व महिला बळकटीकरणाचे संदेश देण्यासाठी भाटये समुद्रकिनाऱ्यावर भव्य मानवी साखळी तयार करण्यात आली होती.
समुद्र किनारी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चे संदेश देणारे वाळू शिल्पही साकारण्यात आले होते. तसेच 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या विषयावर पथनाट्य आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, रत्नागिरीच्या सभापती विभांजली पाटील, प्र.जिल्हा शल्य चिकीत्सक संघमित्रा फुले, भाटये ग्रामपंचायतीचे सरपंच पराग भाटकर, जिल्हा परिषदेच्या विविध खात्याचे खाते प्रमुख, विविध क्षेत्रातील महिला, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थीनी आदि मान्यवर उपस्थित होते.