रत्नागिरी -15 ते 20 महिला एकत्र आल्या की काय करू शकतात, हे चिपळूण तालुक्यातील मांडवखरी येथील महिलांनी दाखवून देत शेतीतून स्वतः काहीतरी करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी एक आदर्श घालून दिला आहे. या महिलांना साथ दिली आहे ती दिशांतर या ( Dishantar Work In Rural Area ) संस्थेने. ग्रामीण भागात एकेकाळी शेती हाच व्यवसाय होता, पण आज मात्र शेती आणि शेती आधारित व्यवसाय करण्यापेक्षा माणूस शहरांच्या गर्दीत हरवू लागला आहे. त्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष होत चाललं आहे. त्यामुळेच कोकणातील भौगोलिक आणि उपजीविकेसंदर्भातील परिस्थितीचा अभ्यास करून दिशान्तर संस्थेने अन्नपूर्णा प्रकल्पाची ( Annapurna Project ) निर्मिती केली. त्यासाठी चिपळूण तालुक्यातील मांडवखरी गावात प्रकल्प साकारायचं ठरलं आणि या कामाला कन्साई नेरोलक कंपनीने साथ दिली आणि उभा ठाकला विषमुक्त अन्न आणि अन्न सुरक्षितता देणारा अन्नपूर्णा प्रकल्प. अन्नपूर्णा प्रकल्पाला न्याय देऊ शकतील, अशा लक्ष्य गटाची निवड करणे गरजेचे होते आणि म्हणून प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी आणि नाविन्याचा ध्यास असलेल्या मांडवखरी येथील महिला स्वयंसहायता गटाची प्रकल्पासाठी निवड करण्यात आली. अन्नपूर्णा प्रकल्प हा 20 अल्पभूधारक, भूमिहीन महिला शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांसोबत राबवण्यात आला आहे. जवळपास 10 एकरमध्ये हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी कन्साई नेरोलेक पेंट्स लि. कंपनीने 3 वर्ष सातत्यपूर्ण निधी सहयोग उपलब्ध करून दिला.
प्रकल्प कसा यशस्वी झाला? -गेल्या 3 वर्षांत हा प्रकल्प केवळ यशस्वी नाही तर स्वयंचलित झाला. या कालावधीत महिलांना शेतकरी गटाच्या माध्यमातून संघटीत करण्यात आले. परसबाग, धिंगरी अळंबी उत्पादन असे उपक्रम या प्रकल्पात समाविष्ट करण्यात आले. शेतीसंदर्भाने कार्यशाळा, अभ्यास सहली, कृषी विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांत सहभाग आणि सहकारातून प्रत्यक्ष विषमुक्त शेती सुरु झाली. या शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची लागवड करण्यात आली. यामध्ये वांगी, भेंडी, पडवळ, दुधीभोपळा, गवार, पावटा, चवळी, मिरची, कोबी आदी प्रकारच्या भाज्यांचं आणि तेही रासायनिक खतांशिवाय उत्पादन घेतलं जातं. या भाज्यांची विक्री देखील या महिला स्वतःच आजूबाजूच्या गावांमध्ये करतात. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे लॉकडाऊनच्या काळात या महिलांना कुटुंबासाठी आर्थिक हातभार लागण्यास मदत झाली.
वार्षिक उत्पन्न -या विषमुक्त शेती प्रकल्पामुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता आलं आहे. सहकारातून केलेल्या सामुदायिक शेतीतून प्रती कुटुंब वार्षिक सरासरी 45000 रुपयांचे उत्पन्न वाढले. परसबागेतून प्रती कुटुंब वार्षिक उत्पन्नात सरासरी 35000 रुपयांची वाढ झाली, तर अळंबी उत्पादनातून प्रती कुटुंब वार्षिक उत्पन्नात सरासरी 47000 रुपयांची वाढ झाली. जिल्ह्यातील या अभिनव व यशस्वी प्रकल्पातून शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होण्यास मदत होते आहे.