रत्नागिरी- तालुक्यातील साखरतर मोहल्ला येथे कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळला आहे. साखरतर येथे घरीच राहणाऱ्या ५२ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या परिसरात जिल्ह्याबाहेरून कुणी आले आहे का, याचा शोध सुरू असून परिसर सील करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू झाली आहे.
जिल्ह्यात आधी गुहागर नंतर राजीवडा येथे कोरोनाचा रुग्ण सापडला होता. राजिवडा येथे दिल्लीतून आलेल्या एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्याला ५ दिवसांचा कालावधी झालेला असतानाच मंगळवारी साखरतर येथील महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. साखरतर येथील महिलेला ४ एप्रिलला ताप असल्याने तिला शहरातील एका खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टर्सना महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याचा संशय आल्याने या महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याच दिवशी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर, जिल्हा रुग्णालयाने संबंधित महिलेच्या थुंकी, स्वॅबचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. मंगळवारी दुपारी महिलेचा अहवाल जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला असून ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.