रत्नागिरी- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने शनिवार आणि मंगळवारचा आठवडी बाजार रद्द केला आहे. त्यामुळे आज (मंगळवारी) बाजारात शुकशुकाट होता.
रत्नागिरीत आठवडी बाजार बंद... हेही वाचा-कोरोनाने देशाचा जीडीपी घसरून ५.३ टक्के होणार - मूडीजचा अंदाज
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभर खबरदारी घेतली जात आहे. ठिकठिकाणी जमावबंदीचे आदेशही लागू करण्यात आले आहेत. तसेच गर्दीची ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. रत्नागिरी नगर परिषदेने रत्नागिरी शहरात भरणारे दोन आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी शहरात मंगळवार तसेच शनिवारी आठवडा बाजार भरतो.
कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणाहून तसेच स्थानिक व्यापारी या बाजारात माल घेऊन येत असतात. शनिवारच्या आठवडी बाजारात छोटे, मोठे व्यापारी, खरेदीदार असे हजारो लोक एकत्र येतात. मंगळवारच्या आठवडी बाजारातही तिच परिस्थिती आहे. यामध्ये जिल्ह्याबाहेरुन येणार्या व्यापारी आणि खरेदीदारांचाही समावेश आहे. एकाच ठिकाणी अनेक वस्तू मिळत असल्याने आठवडा बाजारात नागरिकांची मोठी गर्दी असते. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी आणि खबरदारी म्हणून बाजार बंद करण्याचा निर्णय रत्नागिरी नगर पालिकेने घेतला आहे.
तसेच पालिकेच्या व्याययामशाळा नाट्यगृह, मैदाने आणि गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आरोग्य यंत्रणेलाही सज्ज राहण्याचे आदेश नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी दिले आहेत.