रत्नागिरी -भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकार राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रलंबित ( Governor Appointed MLAs Seat ) प्रश्नाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणी आपण पुढाकार घेवून सरकारच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाकडे ( Supreme Court ) दाद मागण्याच्या तयारीत असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant ) यांनी दिली आहे. ते आज (दि. 29 जानेवारी) रत्नागिरीत बोलत होते.
मंत्री सामंत म्हणाले, विधितज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपण यासाठी स्वतः पुढाकार घेणार आहोत. नितीन बानगुडे पाटील यांच्या माध्यमातून मी स्वतः दाद मागण्याचा विचार करत आहे. बारा आमदारांचे निलंबन रद्द झाले आहे. या पार्श्वभूमीवर आम्हालाही न्याय मिळेल, यासाठी हा प्रयत्न असणार आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ), उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ), महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Revenue Minister Balasaheb Thorat ) सर्वांशी चर्चा करणार आहोत. पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांच्यासोबत यासंदर्भात चर्चा झाली असल्याचेही उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.