महाराष्ट्र

maharashtra

'रिफायनरी समर्थकांची मुख्यमंत्री व शरद पवारांशी भेट घडवून आणू, प्रकल्पाबाबत जनमत पाहून निर्णय होईल'

By

Published : Nov 9, 2020, 7:52 PM IST

Updated : Nov 9, 2020, 8:56 PM IST

नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत जनमताचा आदर करून योग्य तो निर्णय होईल, असं आश्वासन जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रिफायनरी प्रकल्प चर्चेत आला असून, रिफायनरी समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Jayant Patil
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

रत्नागिरी - नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत जनमताचा आदर करून योग्य तो निर्णय होईल, असं जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रत्नागिरी दौऱ्यात पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. त्यातच रिफायनरी समर्थकांनीही जयंत पाटील यांची भेट घेऊन निवेदन देत सद्यस्थिती त्यांच्याकडे मांडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घालून देण्याची जबाबदारी मी घेतो, असं आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रिफायनरी समर्थकांना दिलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रिफायनरी प्रकल्प चर्चेत आला असून, रिफायनरी समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

जनमताचा आदर करून योग्य तो निर्णय होईल - जयंत पाटील

या प्रकल्पाबाबत बोलताना पाटील म्हणाले होते की, नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाला जनतेने यापूर्वी तीव्र विरोध केलेला होता. आज नाणारला विरोध करण्याची भूमिका ज्यांनी सत्तेत असताना मांडली, त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आम्ही सत्ता स्थापन केली आहे. या भागातल्या जनतेचं जे मत आहे, त्या जनमताचा आदर करून योग्य तो निर्णय होईल, असं जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्पष्ट केलं.

परिणामांचा स्थानिक जनतेला त्रास होणार नसेल तर अशा प्रकल्पांचं स्वागतच केलं पाहिजे -

राज्यामध्ये नवीन गुंतवणूक यायला पाहिजे, तिचं स्वागत करणं आवश्यक आहे. रिफायनरीमुळे स्थानिक शेतीवर, मत्स्यशेतीवर परिणाम होणं, त्याचे दुष्परिणाम जर कोणते होणार असतील तर स्थानिक लोक विरोध करणार हे स्वाभाविक आहे. पण या परिणामांचा स्थानिक जनतेला त्रास होणार नसेल तर अशा प्रकल्पांचं स्वागतच केलं पाहिजे, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

रिफायनरी समर्थकांनी घेतली जयंत पाटील यांची भेट -

दरम्यान रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची रिफायनरी समर्थकांनी भेट घेतली. रिफायनरी प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर समर्थन वाढले आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न व्हावेत आणि या प्रकल्पाची अधिसूचना पुन्हा काढली जावी, अशी मागणी यावेळी जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

मुख्यमंत्री व खा. शरद पवार यांची भेट घडवून आणण्याचं जयंत पाटील यांचं आश्वासन -

साडेआठ हजार एकर जागा मालकांनी जागा देण्यासाठी दिलेली संमतीपत्रे मंत्री पाटील यांच्यापुढे सादर करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह खासदार शरद पवार यांची भेट घडवून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी जयंत पाटील समर्थकांना आश्वस्त करताना म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाबरोबरच शरद पवार यांनी कधीही प्रकल्पाला विरोध केलेला नाही. प्रकल्पाचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत. त्यामुळे दोघांची वेळ घेतल्यानंतर तुम्हाला कळवतो, असं पाटील यांनी समर्थकांना सांगितल्याची माहिती कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अविनाश महाजन यांनी दिली आहे. दरम्यान यामुळे पुन्हा रिफायनरी प्रकल्प चर्चेत आला आहे.

Last Updated : Nov 9, 2020, 8:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details