रत्नागिरी - विदर्भ-मराठवाड्यात पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष कोकणातही दिसत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर उन्हातान्हात काबाडकष्ट करायचे आणि पाण्याच्या एका हंड्यासाठी रात्री पोराबाळांसह विहिरीतील खड्ड्यात साठलेले पाणी भरण्यासाठी रात्र जागवायची, अशी परिस्थिती सध्या रत्नागिरीतल्या ग्रामस्थांवर आली आहे. रत्नागिरीत कुठे आहे हे भयाण वास्तव, का होत आहे लोकांची परवड. पाहूया यासंदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट.
रत्नागिरीत हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थ जीवावर उदार रत्नागिरी तालुक्यातील केळ्ये गावातल्या पड्यारवाडीतील विहिरींनी दोन महिन्यापूर्वीच तळ गाठला आहे. त्यामुळे कोरड्या पडलेल्या विहिरीत झिरपणाऱ्या एका झऱ्याद्वारे वाडीतील ७० कुटुंब आपले तहान भागवत आहेत. मात्र, या पाण्याच्या थेंबासाठी लोकांना आपल्या जीवाशी खेळावे लागत आहे. ३५ फूट खोल असलेल्या या विहिरीतील खड्ड्यात झऱ्यातून पाणी साठते. हे साठलेले पाणी भरण्यासाठी विहिरीच्या जीर्ण झालेल्या पायऱ्यांवरून तारेवरची कसरत करत त्यांना उतरावे लागते. बॅटरीच्या प्रकाशात त्यांची ही चढाओढ सुरु असते. पुरुषांबरोबर स्त्रिया, लहान मुलेही जीवाची पर्वा न करता या पाण्यासाठी जीवावर उदार होत विहिरीत उतरतात. अशीच स्थिती राहिली तर जीवनच कठीण असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
याच पड्यावरवाड्यात राहणारी साक्षी ही मुलगी १२ वीत शिकत आहे. मात्र, मागील कित्येक वर्षांत साक्षीने उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाचे तोंडही पाहिलेले नाही. याचे कारण आहे पाणी. मोलमजुरीसाठी आईवडील दिवसभर घराबाहेर असल्याने पाण्यासाठी वणवण करण्याची जबाबदारी साक्षीवर आहे. तासनतास थांबल्यानंतर एक ते दोन हंडे भरायचे. त्यानंतर पुन्हा रांगेत उभे रहायचे, असे साक्षीचे दररोजचे काम.
सध्या या ७० कुटुंबाना टँकरच्या पाण्याची नितांत आवश्यकता आहे. दोन वर्षांपूर्वी या वाड्याला टँकरचे पाणी मिळाले होते. दरम्यान, यावर्षीही टँकरची मागणी करण्यात आली. मात्र, प्रशासनाने गावाला अजबच उत्तर दिले. दुष्काळनिर्मित गावालाच टँकर दिला जातो. जिथे विहिरी नाहीत त्याला दुष्काळनिर्मित गाव म्हटले जाते. मात्र, तुमच्या गावात विहिरी आहेत. त्यामुळे तुम्हाला टँकर देता येणार नाही, असे खुद्द तहसीलदारांनीच संगीतल्याचे ग्रामपंचायत सदस्या सिद्धी वाडकर यांनी सांगितले.
भरपूर पाऊस पडणाऱ्या कोकणात हे भीषण वास्तव पहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक गावांतही अशीच स्थिती आहे. मात्र, कधीकधी लोकांचा आठमुठेपणाही याला जबाबदार ठरतो. पड्यारवाडीसाठी बोअरवेल मंजूर आहे. मात्र, जमिनीच्या वादावरून ती रखडली. वाद नसता तर पाण्यासाठी अशी वणवण करण्याची वेळ आली नसती, असे ग्रामस्थांना वाटते. त्यामुळे निदान पाण्यासाठी तरी गावकऱ्यांनी एक होणे आवश्यक आहे.